'तिबेट टू मासोद व्‍हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा 
: ‘चक्रवाक’ किंवा ब्राम्‍हणी बदक या नावाने ओळख असलेले पक्षी नेपाळहून स्‍थलांतर करत वर्धा जिल्‍हयातील मासोद गावाजवळील तालावांमध्‍ये दरवर्षी प्रमाणे आले आहेत. अत्‍यंत देखना आणि आकर्षक असणारा ‘चक्रवाक’ तलावांचे सौंदर्य खुलवत आहे. २ डिसेंबर रोजी पक्षी अध्‍ययनानिमित्‍त वरिष्‍ठ पक्षी विशेषज्ञ अरण्‍यऋषि मारुती चितमपल्‍ली यांच्‍या नेतृत्‍वात मानद वन्‍य जीव संरक्षक कौशल मिश्र, बी. एस. मिरगे, राजदीप राठोड आणि चेतन भट्ट यांनी एका भेटीत चक्रवाक विषयी माहिती घेतली.
‘चक्रवाक’ पक्षी हिमालयापलीकडून म्‍हणजे तिबेट येथून स्‍थलांतर करुन थंडीच्‍या हंगामात जवळपास चार महिने तलावावर वास्‍तव्‍यास येतो. वर्धेपासून जवळपास 38 किमी अंतरावर मासोदजवळील महाकाळी धरणाचे बॅकवाटर व कारंजा तहसीलमधील मेटहिरजी गावाजवळील मेट तलावावर चक्रवाक दर वर्षी येतात. तलावातील  मारसेरिया मायनुटा, चतुस्‍पानी, लहान झिंगे आणि देवधान खावून ते गुजरान करतात. चक्रवाकविषयी चितमपल्‍ली सांगतात की पक्षी जज्‍ज्ञ स्‍टुअर्ट बेकर यांनी चक्रवाक संबंधी लिहिले आहे. त्‍यांच्‍या मते हे पक्षी जोडीने विहार करतात. नदिच्‍या एका काठाने मादी व दुस-या काठाने नर एकमेकांना आवाज देवून आपल्‍या अस्तित्‍वाची खबर देतात. नर-मादींचे घनिष्‍ठ संबंध यातून दिसून येते. चितमपल्‍लींच्‍या पक्षी कोशात चक्रवाकला इंग्रजीत ब्राम्‍हणी शेलडक, हिंदीत चकवा, चकवी, सुरखाब तर मराठीत कवंदर, काऊ, दाऊ, गोसावी बाड्डा व चक्रवाक अशी नावे दिली आहेत. पालि भाषेत त्‍याला चक्‍कवाक असे संबोधले जाते. अथर्ववेदात तर त्‍याला दाम्‍पत्‍य प्रेमाचे आदर्श प्रतीक मानले गेले आहे. त्‍याची ठेवण विविध रंगांच्‍या आकर्षक छटांतून तयार झाली असल्‍याने तो दिसायला मनमोहक आणि सुंदर वाटतो. त्‍याचा रंग तांबडा असल्‍याने त्‍यास ‘रडी’ हे विशेषण दिले आहे. पीत नारंगी, सोनेरी, हरित श्‍यामल इत्‍यादी रंगाच्‍या मिश्रणाने त्‍याला अद्वितीय सौदर्य लाभले आहे, असे पक्षी कोश सांगतो. विमान उतरावे तसे त्‍याचे पाण्‍यावर छान लँडिंग असते, ते बघण्‍यासारखेच असते.  शांत तलाव, मोठया नद्यांचे काठ याजागी तो आढळतो. स्‍वच्‍छ आणि वनस्‍पती रहित पाण्‍याचे त्‍याला अधिक आकर्षण असते. पालि साहित्‍यात चक्रवाकाचा उल्‍लेख बौद्ध ग्रंथ ‘मिलिंद प्रश्‍न’ च्‍या रूपाने राजा मिलिंद आणि आचार्य नागसेन यांच्‍यात झालेल्‍या प्रश्‍न-उत्‍तरातून झालेला आहे. त्‍यात चक्रवाकाचे तीन महत्‍वाचे गुण सांगितले आहे. एक चक्रवाक हा आपल्‍या जोडीदाराला कधीही सोडत नाही. दुसरा तो शेवाळ आणि पाण्‍यात उगवणारी वनस्‍पती खावून संतुष्‍ट होतो त्‍यामुळे त्‍याची शक्ती आणि सौंदर्य कधी घटत नाही. आणि तीसरा गुण म्‍हणजे तो कोणत्‍याही प्राण्‍याला इजा पोहचवित नाही. चक्रवाकाचे गुण भिक्षुंनी घ्‍यावे हा त्‍यातील संदेश. यातून चक्रवाकाचे महात्‍म्‍य दिसून येते.

वर्धा जिल्‍हयातील तलावांवर स्‍थलांतरित आणि भारतीय पक्षांचे एक सर्वेक्षण मानद वन्‍य जीव संरक्षक कौशल मिश्र यांनी वन विभागाच्‍या सोबतीने तीन वर्षाआधी केले होते. यातून आलेल्‍या पाहणीतून ते म्‍हणतात की पाण्‍याची कमतरता आणि वातावरणात घडणारे बदल यामुळे स्‍थलांतरित पक्षांची संख्‍या झपाटयाने कमी झाली आहे. या वर्षी तलावातील पाण्‍याची पातळी खालावली आहे. यामुळे नेपाळ, भूटान तसेच यूरोपीय देशातून येणा-या पक्षांची संख्‍या घटत आहे. सन 2015-16 च्‍या गनणेत इतर पक्षांसह चक्रवाकची संख्‍या पाचशे पेक्षा जास्‍त होती. ते म्‍हणतात की ही परिस्थिती पक्षांकरिता धोक्‍याची घंटा ठरू शकते. राजहंस म्‍हणजे बार हेडेड गुज सारखे पक्षी तर कधी-काळीच दिसतात. पक्षी तज्‍ज्ञ आणि प्रेमीकरिता हा निराशाजनक संदेश ठरू शकतो. पर्यावरणातील महत्‍वाचा घटक असलेल्‍या स्‍थलांतरित आणि भारतीय पक्षांची घटत असलेली संख्‍या याविषयी जागृती करण्‍याची आवश्‍यकता यानिमित्‍ताने गरजेची आहे असे चितमपल्‍ली यांचे म्‍हणने आहे.   Print


News - Wardha | Posted : 2018-12-04


Related Photos