महत्वाच्या बातम्या

 मराठीतूनही चांगला युक्तिवाद होऊ शकतो : हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत


- वकिलांना मुद्देसूद बोलण्याचा सल्ला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे मातृभाषा मराठीत उपलब्ध होण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. याचदरम्यान न्यायालयाने शुक्रवारी मराठी भाषेचे गोडवे गायले.

युक्तिवादाची भाषा कुठलीही असो, मुद्देसूद मांडणी करता आली पाहिजे. केवळ इंग्रजीच नव्हे तर मराठी भाषेतही चांगला युक्तिवाद होऊ शकतो, असे महत्त्वपूर्ण मत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात व्यक्त केले. या अनुषंगाने ज्युनियर वकिलांना मुद्देसूद बाजू मांडण्याचे धडे देण्याचा सल्लाही दिला.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी एका कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी ज्येष्ठ वकील संजीव कदम यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पूर्वी वकिलांच्या मनात इंग्रजी भाषेची अनामिक भीती असायची, असा मुद्दा मांडला. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी भाषेबाबत महत्त्वपूर्ण मते व्यक्त केली. कुठल्याही खटल्यात वकिलांनी युक्तिवाद करताना भाषा सुशोभित करण्याचा प्रयत्न करू नये, तर न्यायालयाला नेमका मुद्दा निदर्शनास आणून देण्यासाठी मुद्देसूद बाजू मांडणे महत्त्वाचे आहे. मग ती भाषा इंग्रजी असो वा मराठी, इथे भाषेचे कुठलेही बंधन नाही. मराठीतही चांगला युक्तिवाद होऊ शकतो. दोन दिवसांपूर्वी एका ज्युनिअर वकिलाने मराठीत युक्तिवाद केला, त्या युक्तिवादाची मांडणी मुद्देसूद होती. त्यामुळे तो अधिक प्रभावी ठरला. पक्षकाराचे नेमके म्हणणे काय आहे हे न्यायालयाला चटकन कळले, अशा शब्दांत न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी मराठी भाषेतील युक्तिवादाचे कौतुक केले. यावेळी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाषेबाबत कुठलाही संकोच न बाळगता मुद्देसूद युक्तिवादाला महत्त्व देण्याचा सल्ला ज्युनियर वकिलांना दिला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रादेशिक भाषांच्या वापरावर भर दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालपत्रांमध्ये नुकतीच मराठी भाषा झळकली आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारी न्यायालयाने मराठीतील युक्तिवादाचे गोडवे गायले.


ज्युनियर वकिलांसाठी कार्यशाळा घेण्याची सूचना

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उभे राहिलेले ॲड. संजीव कदम हे ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष आहेत. न्यायालयाने ज्युनियर वकिलांकडून केल्या जाणाऱ्या युक्तिवादाकडे त्यांचे लक्ष वेधले. न्यायालयावर खटल्यांचा ताण आहे. त्यात बहुतांश ज्युनियर वकील मुद्दा सोडून बराच वेळ युक्तिवाद करतात. ते कुठल्या भाषेत युक्तिवाद करताहेत हे महत्त्वाचे नाही, तर मुद्देसूद युक्तिवाद करणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली. तसेच या अनुषंगाने ज्युनियर वकिलांसाठी कार्यशाळा घेऊन धडे देण्याची सूचनाही केली.





  Print






News - Rajy




Related Photos