महत्वाच्या बातम्या

 पोलीस भरती प्रकार : अधिक गुणांसाठी चीपची अदलाबदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : पोलिस भरतीदरम्यान घेतल्या जाणाऱ्या शारीरिक चाचण्यांचे मोजमाप करण्यासाठी देण्यात आलेल्या चीपची उमेदवारांनी अदलाबदल केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पवई पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

दादर पोलिसांत कार्यरत असणारे पोलिस निरीक्षक राजेंद्र काळभोर यांनी पवई पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, अंधेरीच्या मरोळ मैदानात होणाऱ्या परीक्षेत मैदान प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली होती. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या शारीरिक चाचण्यांच्या निकालांची नोंद करण्यासाठी पोलिस आरएफआयडी चिप्स वापरतात. ज्यातून धावणे आणि गोळाफेक यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे मोजमाप केले जाते. त्यानुसार मरोळ मैदानात २२ फेब्रुवारीपासून मुंबई पोलिस शिपाई व चालक पदासाठी मैदानी परीक्षा घेण्यात येत आहेत.

१ मार्च रोजी सकाळी ६ वाजता घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत डिटेल क्रमांक ३६ मधील काही उमेदवारांनी त्यांच्या डिटेलमधील चेस्ट क्रमांक १०७५, १०७८ यांना सोळाशे मीटर धावण्याच्या मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांवर आक्षेप घेतला होता. ज्यांची नावे निखील यादव आणि विकास सरदार अशी आहेत. त्यामुळे या मैदानाच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली गेली ज्यात त्यांनी नमूद वेळेनुसार धावण्याची चाचणी त्या दोघांनी पूर्ण केली नसल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांच्या नोंदणीच्यावेळी बांधण्यात आलेली चीपची त्यांनी अदलाबदल केल्याचेही कंपनीच्या टेक्निकल टीमने दिलेल्या अहवालात उघड झाले.

१ हजार ६०० मीटरच्या शर्यतीत गैरवर्तन

शुक्रवारी संध्याकाळी १ हजार ६०० मीटरच्या शर्यतीत सहभागी झालेल्या इतर आठ इच्छुकांनी असेच गैरवर्तन केल्याचे आढळले.

उमेदवारांनी १०० मीटरच्या शर्यतीत फसवणूक केली नाही. तथापि, जेव्हा त्यांना १ हजार ६०० मीटरच्या शर्यतीपूर्वी तंबूखाली एकत्र येण्यास सांगितले गेले, तेव्हा उमेदवारांनी अधिक गुण मिळविण्यासाठी त्यांच्या चिप्सची देवाणघेवाण केली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

हा अहवाल सशस्त्र पोलिस दल मरोळचे पोलिस उपायुक्त यांनी सादर केल्यावर पवई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





  Print






News - Rajy




Related Photos