महत्वाच्या बातम्या

 भाषेची रुजवणूक घरातूनच व्हावी : रोहन घुगे


- मराठी भाषा गौरव दिन साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कोणतीही भाषा ही नगण्य नसते. मात्र, मातृभाषा ही आकलनासाठी आणि ज्ञानसंवर्धनासाठी उत्तम माध्यम असते. मराठी भाषा टिकली पाहिजे, असे वाटत असेल तर त्या भाषेचा वापर घराघरात आणि दैनंदिन व्यवहारात केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिन समारोहात केले. 

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारोहाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले होते. मंचावर शिक्षा मंडळाचे मंत्री संजय भार्गव, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रदीप दाते, शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी उषा तळवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रशासकीय कामकाजात राजभाषा म्हणून होणारा मराठी भाषेचा वापर हा सर्वसामान्यांच्या हितासाठी असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले म्हणाले. मराठी ही प्राचीन भाषा असून शब्दसंग्रह आणि साहित्यमूल्याच्या दृष्टीनेही समृद्ध भाषा आहे. साडेआठ कोटी लोक मराठी भाषा बोलत असून जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.

मराठी ज्ञानभाषा म्हणून स्वीकारून अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय आदी उच्चशिक्षणाचे अभ्यासक्रम मातृभाषेत आल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना मिळेल. दैनंदिन जीवनात भाषेच्या शुद्ध अशुद्धतेचे न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकले तरच भाषा जिवंत राहील, असे मत संजय इंगळे तिगावकर यांनी मांडले.

या समारोहात संजय भार्गव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन जगताप यांनी केले. संचालन ज्योती भगत आणि संदीप चिचाटे यांनी केले, तर आभार उषा तळवेकर यांनी मानले. कार्यक्रमाला मराठी भाषा समितीचे सदस्य प्रा. पद्माकर बाविस्कर, आशीष पोहाणे, डॉ. रत्ना चौधरी, रंजना दाते, सुनील तितरे, जीवन चोरे, ॲड. पूजा जाधव, संगीता इंगळे, पल्लवी पुरोहित, दीपक गुढेकर, सुरज बोदीले, संजय टोणपे, धनंजय नाखले, नंदिनी बर्वे यांच्यासह विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.





  Print






News - Wardha




Related Photos