राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीत होणे अभिमानास्पद, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम


- राज्यस्तरीय १४ वर्ष वयोगट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: नक्षलग्रस्त व अतिदुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होणे ही अभिमानास्पद बाब आहे. राज्यभरातून गडचिरोलीत आलेल्या खेळाडूंचे कौशल्य पाहून गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंच्या विकासासाठी आपण प्रयत्नशिल असून खेळाडूंना प्रोत्साहन देवून खेळण्यास तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास, वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्ग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज १ डिसेंबर रोजी ना. आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. आत्राम बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई भांडेकर, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद विभागातील चमू गडचिरोलीत दाखल झाल्या आहेत. 
पुढे बोलताना ना. आत्राम म्हणाले, मी स्वतः क्रिकेटचा खेळाडू होतो. यामुळेच मी आज राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहू शकलो. या आधी मी कौंटी क्रिकेट पर्यंत खेळलेलो आहे. याशिवाय इंग्लंडमध्येसुध्दा  आपण क्रिकेट खेळले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रथमच गडचिरोली येथे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होत आहे. यामुळे अशा स्पर्धांमधून जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. यातूनच राज्य तसेच देशासाठी खेळणारे खेळाडू निर्माण होतील, असेही ना. आत्राम म्हणाले.
यावेळी बोलताना आ.डाॅ. देवराव होळी यांनी जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतल्याबाबत अभिनंदन केले. गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील इतर भागातून येणारे खेळाडू भित असतात. मात्र जिल्ह्यात कसल्याही प्रकारची भिती नसून बिनधास्त खेळून यशोशिखर गाठावे, असे आवाहन आ.डाॅ. होळी यांनी केले. यावेळी जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. सदर स्पर्धा ३ डिसेंबरपर्यंत राहणार आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-01


Related Photos