आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांच्या माध्यमातून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणासाठी अभिनव योजना राबवून सक्षम व सुदृढ पिढी घडविण्यासाठी महत्वाचे पाउल टाकले आहे. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहीनी आदिवासी जिवनदायीन योजना राबविण्यात येणार असून भामरागड प्रकल्पांतर्गत या योजनेचा शुभारंभ आज ३० नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त डाॅ. संजिवकुमार यांच्याहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड, उपवनसंरक्षक सिध्देश सावर्डेकर, भामरागड न.पं.च्या नगराध्यक्षा संगिता गाडगे, प्रकल्प अधिकारी निरज मोरे, तहसीलदार कैलास अंडील, संवर्ग विकास अधिकारी चन्नावार, नायब तहसीलदार सोनवने, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ३०१ शासकीय आश्रमशाळा व ८  एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये एक लाख ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस  यांच्या सुचनेनुसार आदिवासी विकास विभागाने अटल आरोग्य वाहिणी, आदिवासी जिवनदायीनी ही सर्वसमावेशक योजना तयार केली आहे. योजना तयार करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच दुर्गम भागात असलेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांना आपात्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने उपचार मिळावेत याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकी ४ ते ६ आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांचा एक समुह असे ४८ क्लस्टर तयार करण्यात आले आहे. प्रत्येक क्लस्टरसाठी १ याप्रमाणे ४८ सुसज्ज रूग्णवाहिका २४ तास तैनात असतील. बेसीक लाॅईफ सपोर्ट सह सज्ज असलेल्या या रूग्णवाहिकांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी व एक आरोग्य सहाय्यक उपलब्ध असतील.
या योजनेत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची नियमित तपासणी केली जाणार आहे. साथीच्या रोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक औषधे व इंजेक्शन यांचा पुरेसा साठा उपलब्ध असेल. प्रत्येक विद्यार्थ्यांचे डिजीटल हेल्थ कार्ड करण्यात येणार असून त्यावर त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतची पुर्ण माहिती असेल. नियमित डाॅक्टरांबरोबरच डोळे, त्वचा रोग, कान, नाक व घसा या क्षेत्रातील तज्ञ डाॅक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी दिली.
विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार यांनी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी तत्पर करण्यात आलेल्या अटल आरोग्य वाहिनी आदिवासी जीवन दायीनी योजनेची प्रशंसा केली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-30


Related Photos