बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात सरकार गंभीर : ना. तावडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या  शाळांवर  उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची कार्यवाही सुरु असून येत्या २ महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करुन दोषी आढळलेल्या संबंधिताविरुध्द कारवाई केली जाईल.  असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या  शाळांवरील कारवाई संदर्भात आशिष शेलार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तावडेंनी उत्तर दिले. ‘राज्यातील विशेष पटपडताळणी मोहिमेमध्ये राज्यातील १४०४ शाळांमध्ये सदर दिवशी ५० टक्के पेक्षा कमी उपस्थिती आढळून आली. विशेष पटपडताळणी मोहिममध्ये ५० टक्के कमी उपस्थिती आढळलेल्या व त्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या व्यवस्थापनांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना २४ जुलै २०१८ रोजी दिले आहेत. याप्रकरणी काही शाळा उच्च न्यायालयात गेल्या. त्यावेळी न्यायालयाने शाळांविरुध्द कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत’, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शाळांमधील पटसंख्या सरल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरलमध्ये लिंक करण्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, १५ टक्के काम शिल्लक असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे २०१२ चा यासंदर्भातील शासन निर्णय पुनर्रचित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.   Print


News - Rajy | Posted : 2018-11-30


Related Photos