कालिदास समारोहाचा समारोप , संगीता शंकर यांच्या 'गाणा-या व्हायोलिन'ने आणि परविन सुलताना यांच्या बहारदार गायनाने रसिक तृप्त


- नागपूरच्या रसिकांनी अनुभवली सांगितिक पर्वणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर  :
कालिदास समारोहाच्या समारोप सत्रात संगीता शंकर यांच्या 'गाणाऱ्या  व्हायोलिन'ने आणि परविन सुलताना यांच्या बहारदार गायनाने रसिक तृप्त झाले. 
  कविवर्य सुरेश भट सभागृह येथे कालिदास समारोह आयोजन समिती, पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या सहयोगाने कालिदास समारोहाचे आयोजन करण्यात आले. समारोहाच्या आजच्या समारोप सत्रातही रसिकांची भरगच्च उपस्थिती होती.  संगीता शंकर यांनी सुरुवातीला व्हायोलिनवर श्याम कल्याण राग सादर केला. विलंबित गत एकतालात तर द्रुत गत आडा चौतालात निबद्ध होती.
श्याम कल्याणच्या शांत रसात आणि संगीता शंकर यांच्या  'गाणा-या व्हायोलिन'च्या सुरावटींमध्ये रसिक न्हाऊन निघाले. त्यांना नंदिनी शंकर यांनी व्हायोलिनवर समर्पक साथ केली. तबल्यावर साथ अनुराधा पाल यांनी केली. त्यानंतर संगीता शंकर यांनी खमाज रागातील 'बनारसी दादरा' सादर केला. खमाज रागातील एक-एक जागा खुलवत त्यांनी रसिकांना मनमुराद स्वरानंद दिला. अनुराधा पाल यांनीही त्यांना बहारदार तबलासाथ दिली.
'नरवर कृष्णासमान' या नाट्यपदाने त्यांनी आपल्या व्हायोलिन वादनाचा समारोप केला. संगीता शंकर यांच्या गायकी अंगाच्या व्हायोलिन वादनाने रसिक तृप्त झाले. पद्मभूषण परविन सुलताना यांनी आपल्या गायनाचा प्रारंभ राग मारू बिहागने केला.'कैसे बिन साजन' ही विलंबित एकतालातील तर 'कवन न किन्हो' ही द्रुत तीनतालातील बंदिश त्यांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी मलुहा-मांड या रागात झपतालात निबद्ध बंदिश व तराणा सादर केला. 'रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते' हे गीतही त्यांनी सादर केले. भवानी दयानी या भैरवीने त्यांनी आपल्या गाण्यांनी सांगता केली. त्यांना तबल्यावर साथ मुकुंदराज देव यांनी तर संवादिनीची समर्पक साथ श्रीनिवास आचार्य यांनी केली. तानपुऱ्यावर ऋतुजा लाडसे, शीतल भेंडारकर यांनी साथ केली. तिन्ही सप्तकात लिलया फिरणारा आवाज, सरगम व तानांनी त्यांनी रसिकांचे मन जिंकले.
विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार म्हणाले, कालिदास समारोहाला नागपूरकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही परंपरा कायम राखण्यात येईल व असेच उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
  जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, तीन दिवसीय कालिदास समारोह ही नागपूरकर रसिकांसाठी सांगितिक मेजवानी ठरली. महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले, 'शाकुंतल' हे प्रतिभेचा अत्युच्य अविष्कार आहे. कालिदास समारोहाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र व देशाची संस्कृती जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनेही आगामी वर्षात आयोजित करण्यात येणार असल्याचे अभिमन्यू काळे यांनी सांगितले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कालिदास समारोहाला शुभेच्छा संदेश दिला. सूत्रसंचालन श्रीमती रेणुका देशकर व श्रीमती श्वेता शेलगावकर यांनी केले. उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी आभार मानले.
कालिदास समारोहामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली असून संगीतातील समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यात कालिदास महोत्सवाचे आयोजन महत्त्वाची भुमिका बजावत असल्याचे मत रसिकांनी व्यक्त केले.   Print


News - Nagpur | Posted : 2018-11-30


Related Photos