महत्वाच्या बातम्या

 भाषेमुळेच व्यक्तिमत्व घडण्यास मदत : श्रीपाद जोशी


- जिल्हा माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : माहिती आणि ज्ञानाचे विविध स्त्रोत अशा या श्रीमंतीच्या काळात आपली मानसिकता गरीब राहता कामा नये. उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर भाषेशिवाय पर्याय नाही. आज संधीचे प्रारुप तयार झाल्यामुळे स्वत:ला तयार करा. त्यासाठी आपल्या भाषेवर प्रेम करा, असे आवाहन कवी, लेखक, नाटककार श्रीपाद जोशी यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

आपल्या व्यक्तिमत्वातील तेज, सामर्थ्य हे बोलण्यातून प्रगट होते, असे सांगून जोशी म्हणाले, उर्जावान आणि उत्साहाने बोलण्यासाठी सर्वात महत्वाची भाषा असते. त्यासाठी शब्दाचे सामर्थ्य असावे लागते. भाषा ही कोणाच्याही मालकीची नाही. आपण मागास भागातील विद्यार्थी आहोत, असा न्युनगंड मनातून काढून टाका. प्रत्येक विषयावर बोलण्याचे कौशल्य विकसीत करा. त्यामुळे आपली भाषा समृध्द होईल आणि व्यक्तिमत्वात तेज झळकेल. विद्यार्थ्यांनो वाचन नियमित करा. आपल्या भाषेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या.

मराठी भाषेच्या उगस्थानाबद्दल बोलतांना जोशी म्हणाले, इ.स. 400 च्या सुमारास संस्कृत, महाराष्ट्रीय प्राकृत भाषा सुरू झाली. त्यात 18 देशी भाषांचा परिचय केला गेला. इ.स. 900 मध्ये श्रवणबेळगाव येथे शिलालेख सापडला. 1188 मध्ये मुकुंदराज यांनी वैनगंगेच्या तिरावार अंभोरा (जि. भंडारा) येथे विवेकसिंधू हा ग्रंथ लिहिला. 12 व्या शतकाचा काळ हा महानुभावपंथीय काळ म्हणून ओळखला जातो. या काळात चक्रधरांचे शिष्य माइंनभट यांनी दृष्टांत हा ग्रंथ लिहिला. इ.स. 1275 ते 1296 हा ज्ञानेश्वरांचा कालखंड आहे. संत ज्ञानेश्वरांनी 9 हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. त्यानंतर संत नामेदवांनी नाममुद्रा, नामसंकिर्तन रुजविले. 15 व्या शतकात संत एकनाथ, संत रामदास होऊन गेले. त्यानंतर संत तुकारामांनी पाच हजारांच्या वर अंभग लिहिले. 300 – 350 वर्षानंतर आजही तुकारामांचे अभंग मानवी कल्याणासाठी मार्गदर्शनपर आहेत. शिवकालीन साम्राज्यात शाहीर, पोवाडा विकसीत झाला. ब्रिटीश राजवटीनंतर केशवसुत, कवी बी. बालकवी, कुसुमाग्रज, ग्रेस, नारायण सुर्वे आदी कवी, लेखक होऊन गेल्याचे जोशी यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, आपल्या भाषेविषयी जोपर्यंत आपल्याला प्रेम आणि आपुलकी आहे, तोपर्यंत भाषा टिकणार आहे. पिढ्यानपिढ्या भाषा आपल्या सोबत असते. त्यामुळे भाषेवर प्रेम करणे शिका. अभ्यासाच्या रुपाने भाषेला प्रेम द्या, तेवढे तुम्हालाही भाषेचे प्रेम मिळणार आहे.

यावेळी रोजगार मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे म्हणाल्या, स्पर्धा परिक्षेसोबतच भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आयुष्यात लढ म्हणा अशी थाप असली तर पुन्हा आपण गतीने काम करतो. मराठी भाषेचे संवर्धन करायचे, असा सकंल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी तर संचालन सुशील सहारे यांनी केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos