आष्टीत ४० घरे वाचविण्यासाठी नागरिकांचे चक्काजाम, तणावाचे वातावरण


- तिनही मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ आष्टी :
येथील वार्ड क्रमांक १ व ३  मधील २० वर्षांपासून वास्तव्याने राहत असलेल्या नागरीकांची घरे बेकायदेशिर असल्याचे आदेश न्यायालयाने काढल्याने याविरोधात नागरिकांनी आज २९ नोव्हेंबर रोजी आष्टी येथील आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन केले. यामुळे आष्टी येथे तणावाचे वातावरण आहे. घर पाडण्याचे आदेश आल्यानंतर ४० घरे वाचविण्यासाठी सकाळी ९ वाजतापासून चक्काजाम सुरू करण्यात आला. तब्बल एक तास तिनही मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.
आष्टीचे पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर चामोर्शी येथील नायब तहसीलदार  तनगुलवार आष्टी येथे दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी आपले निवेदन सादर केले. तनगुलवार यांनी प्रत्यक्ष वार्ड क्रमांक १ मध्ये जावून पाहणी केली.  उपविभागीय अधिकारी नितीन सदगिर हेसुध्दा आष्टीत दाखल झाले. महसूल मंडळ अधिकारी कार्यालयात जावून दस्तवेजांची पाहणी केली व न्यायालयात ‘क’ सिट दाखल करण्याचे आदेश दिले.
आंदोलनामध्ये सरपंचा वर्षा देशमुख, राकेश बेलसरे, जि.प.सदस्या रूपालीताई पंदिलवार, संजय पंदिलवार, कपिल पाल, नंदाताई डोर्लीकर, शंकर मारशेट्टीवार, बंडू चौधरी , व्यंकटेश बुर्ले, आनंद कांबळे, छोटू दुर्गे, खेमराज येलमुले, चंद्रय्या गोटीपर्तीवार, विलास फरकाडे, अन्वर सय्यद, कुकडे, ठाकूर, सत्यशिल डोर्लीकर यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. 

असे आहे प्रकरण 

नागरिकांच्या  माहितीनुसार आष्टी येथील बाबुराव रूषी लखमापुरे यांनी स्वतःची जमीन ७० नागरिकांना १९७१ पासून १९८९ पर्यंत विक्री केली आहे. विक्री करण्यात आलेल्या सर्वांच्या नावे फेरफारसुध्दा घेण्यात आला आहे. त्या भूखंडांमध्ये सध्या ३० ते ४० जणांनी पक्की घरे बांधली आहेत. मात्र २४ मार्च २००४ ला तत्कालीन तहसीलदारांना हाताशी धरून सर्व लोकांची नावे खारीज करून बळवंत चंद्रशेखर गौरकार व इतरांनी खोटे दस्तवेज सादर करून आपल्या नावाची नोंद करून घेतली.  गंगुबाई उर्फ बजी फकीरा चौथाले यांनी १९४८ ला चंद्रपूर येथील न्यायालयात सदर जमीन चंद्रशेखर पुंडलिक गौरकार यांना काही अटींच्या आधारे बक्षीसपत्र लिहून दिली होती. परंतु बक्षिसपत्राचे पालन न केल्यामुळे १२ एप्रिल १९५५ मध्ये बक्षिसपत्र रद्द करण्यात आले. त्यामुळे चंद्रशेखर गौरकार यांचा त्या जमिनीवर कोणताही मालकी हक्क नाही. असे असतानाही काही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासन व न्यायालयाची दिशाभूल करून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २४ डिसेंबर २००३ ला बाबुराव रूषी लखमापुरे यांचे नाव कमी करून बळवंत गौरकार व इतरांचे नाव कोणतेही दस्तावेज सादर न करता सर्व्हे  क्रमांक १२१ चढविण्यात आले. सर्व्हे   क्रमांक १२१ चा वाद सुरू असताना सर्व्हे  क्रमांक १२२ , १२३ , १२४ व सरकारी जागा सर्व्हे  क्रमांक ११ या जमीनीवर बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. 
सर्व्हे  क्रमांक १२२ मधील नावे कमी करण्याचा कोणताही आदेश नसताना कोणतीही पूर्व सुचना न देता अधिकाऱ्यांना हाताशी घेवून सातबारावरील नावे कमी करण्यात आली. सर्व्हे  क्रमांक १२२ मधील कोणताही वाद नसताना घरांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला.
हरीचंद्र हनुमंतू बोरकुटे, बुधाजी येराजी मडावी, कविता खुशाबराव दिवसे, लहुजी हंसकर, उमाजी भिवनकर, मिराबाई चापले, गजानन जोगी, वाल्मीक धवणे यांच्या जागेचा कोणताही उल्लेख नसताना न्यायालयाने विद्युत विभागाला विजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिले. सर्वप्रथम जागा मोजणी करून जागेची चतुःसिमा निश्चित करावी व गैर अर्जदाराची जागा सिध्द करावी. तेव्हाच विद्यूत पुरवठा बंद करण्यात यावा. बंद केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-29


Related Photos