कालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी


- पद्मश्री देवयानी व गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या नृत्य, गीताचा बहारदार कार्यक्रम
-  ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ च्या प्रस्तुतीने प्रेक्षक मंत्रमुग्ध
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर  :
आज कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरतनाट्यमचा ठेका आणि शास्त्रीय संगीतातील विविध रंगाची छटा एकाच मंचावर प्रेक्षकांना आज अनुभवायला मिळाल्या. पद्मश्री देवयानी यांच्या शिवस्वरुपावरील प्रेम आणि नटराज यांना समर्पित वंदना ही गुरु-शिष्यातील प्रेमभाव व्यक्त करीत होता. कौशिकी व सखी मंचच्या प्रमुख कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनातील वेगवेगळ्या संगीत छटा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या. ‘नंद के लाल पे रंग डालो रे…’ अशा गितांच्या माध्यमातून त्यांनी सतार, व्हायोलीन, तबला, पखवाज यांच्या सुरांशी गायनाचे सूर जुळवित जुगलबंदी प्रस्तुत केली.
कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आज कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भरतनाट्यम नृत्यांगना पद्मश्री देवयानी यांनी भरतनाट्यम तर कौशिकी चक्रवर्ती यांनी गायन प्रस्तुत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री देवयानी यांनी जीवनातील नवरसाचे महत्त्व सांगणारे नृत्य प्रस्तुत केले. ‘हे शंभो, शिव शंभो…’ या नृत्य प्रस्तुतीद्वारे त्यांनी भगवान शिवाचे स्वरुप आपल्या नृत्यातून वर्णित केले. अंगावर भस्म धारण करुन सृष्टी संहार करणारे शिव स्वरुप सर्वव्यापी आहे, अशा शैलीत त्यांनी भगवान शिवशंकराची स्तुती केली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पद्मश्री देवयानी यांच्या सहकारी अरुपा लाहीडी यांच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ प्रस्तुतीने पुन्हा एकदा महाकवी कालीदास रचित शकुंतलाची आठवण झाली. राजा दुष्यंत आणि शकुंतलेची पहिली भेट, महर्षी कण्व  यांची मानस कन्या असलेल्या शकुंतलेचा राजा दुष्यंत यांच्याशी झालेला गंधर्व विवाह, त्यानंतर त्यांचा विरह, प्रत्याख्यान आणि राजाच्या सभागृहात आपला मुलगा भरत सोबत आलेली शकुंतला हिची पति व राजा दुष्यंत यांच्याशी झालेले पुनर्मिलन असा प्रसंग आपल्या भरतनाट्यमद्वारे प्रस्तुत करुन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
  पहिल्या सत्राचे समारोप नृत्यांगना पद्मश्री देवयानी यांच्या पदम तसेच शिव पंचाक्षरी ओम नम: शिवाय स्त्रोत्राने करण्यात आली. शिव आणि प्रेम यांच्या सुरेख संगम त्यांनी आपल्या नृत्यातून प्रस्तुत केला.
समारोहाच्या दुसऱ्या सत्रात कौशिकी चक्रवर्ती व सखी यांनी शास्त्रीय संगीत गायनातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत शेवटपर्यंत जागेवर खिळवून ठेवले. यावेळी त्यांना व्हायोलिनवर नंदिनी शंकर, तबल्यावर सावनी तळवलकर, पखवाजवर महिमा उपाध्याय, बासरीवर देबोप्रिया चॅटर्जी, सतारवर अनुपमा भागवत, भक्ती देशपांडे यांनी साथ देत गणेश वंदना, तराना, ‘आनंददायीनी अकार, उकार, मकार रुपीनी…, नंद के लाल पे रंग डालो रे रंग डालो रे…’ या राधा की होलीसारखे शास्त्रीय गायन सादर केले. यावेळी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Nagpur | Posted : 2018-11-29


Related Photos