पबजी गेम च्या विळख्यात तरुणाई, पालकांची वाढतेय डोकेदुखी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
गौरव नागपूरकर / देसाईगंज :
पबजी या गेमच्या विळख्यात तरूणाई अडकली असून वेळेचा होणारा अपव्यय पालकांची डोके दुखी बनली आहे. वडसा शहर तसेच जिल्ह्यामध्ये पबजी या व्हिडीओ गेमने तरूणाईला भुरळ घातली आहे. कोणत्याही चौकात, महाविद्यालयात, अथवा आपल्या वैयक्तिक खोलीत आज पबजी गेम युवक, लहान मुल, तासंतास खेळतानाचे चित्र आहे. विविध टास्क च्या माध्यमातून मारधाड करणाऱ्या या गेमनं सध्या सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. मुलांच्या मनावर विपरित परिणाम करणायऱ्या गेम का बनविल्या जातात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चार महिन्यांपूर्वी हा गेम देशात सादर झाला. दक्षिण कोरियामधील 'ब्ल्यू व्हेल' या कंपनीने 'पबजी' ची निर्मिती केली आहे. या पूर्वी कम्प्युटर गेम्सच्या विश्वात 'काउंटर स्ट्राइक' या गेमने तरुणांना वेड लावले होते. त्यासारखेच साधर्म्य असलेले फीचर्स 'पबजी' मध्येही असल्याने शिवाय त्याची क्रेझ भयंकर वाढली आहे.
कितीही मित्रांना बरोबर घेऊन ऑनलाइन हा गेम खेळणे शक्य आहे. प्रोफाइल तयार केल्यानंतर सुरुवातीला एका मॅपवर (विशिष्ट प्रकारच्या प्रदेशात) तुम्हाला उतरवले जाते. तुमच्या अंगावर फारसे कपडेही नसतात. त्या प्रदेशातच सगळ्याचा शोध घ्यावा लागतो. जशी जशी लेव्हल पुढे जाते तशी शस्त्रास्त्रे, बॉम्ब आणि इतर वस्तू मिळत जातात. समोर साधारण शंभराहून अधिक संख्येने शत्रू असतात. त्यांचा खात्मा करून हा गेम जिंकता येतो. त्यातही वेगवेगळ्या प्रकारचे मॅप आणि प्रकार उपलब्ध केल्याने ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे हा गेम खेळता येतो. आठ मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंत गेम चालतो. गेम खेळत असताना टीममध्ये असलेल्या मित्रांशी ऑडिओ मेसेजद्वारे संवाद साधता येतो, त्यांना मेसेज करता येतो. अनेकजण एका बाजूला गेम खेळत असतात तर, दुसऱ्या बाजूला गप्पांचा फड रंगवतात. एकाच गेममध्ये अनेक गोष्टी मिळत असल्याने 'पबजी'ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
 'पबजी' खेळणारे शुभम म्हणतो की, 'अनेकदा हा गेम स्वस्थ बसू देत नाही. आणखी एक गेम खेळावा, अशी इच्छा उत्पन्न होते. बऱ्याचदा काम सोडून गेम खेळला जातो. रात्री एका गेमच्या बोलीवर सुरू केलेला खेळ पहाटेपर्यंत चालतो. खेळण्याची पद्धत सोपी असल्याने अनेकांना हा गेम आकर्षित करत आहे.'
तरुणांनी  गेम खेळायला हरकत नसली तरी तो  किती वेळ खेळायचा , याला मर्यादा आहेत. तुमच्या दिवसभराच्या कामातून तुम्ही केवळ एक तास गेम खेळत असाल तर, विरंगुळा म्हणून ही बाब सामान्य आहे. पण त्या पेक्षा अधिक काळ काम बाजूला ठेवून हा गेम खेळला जात असेल तर तरुण त्याच्या आहारी जात आहेत, असे म्हणायला वाव आहे. काम बाजूला ठेवून गेम खेळण्याची इच्छा ज्यांच्यामध्ये जागृत होते अशांनी वेळीच यातून सावरायला हवे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-28


Related Photos