‘मी हनुमंता रिक्शावाला’ चित्रपटाचे नायक चिरंजीवी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेस ला सदिच्छा भेट


- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील युवकाची चंदेरी दुनियेत भरारी
- गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
- गडचिरोलीत उद्यापर्यंत पहायला मिळणार चित्रपट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
चित्रपटसृष्टी म्हटले की मोठमोठ्या शहरातील युवकांनाच संधी असते किंवा त्या क्षेत्राशी सबंधितांनाच या क्षेत्रात संधी मिळते असा कायम समज अनेकांच्या मनावर कोरला गेला आहे. मात्र अंगी असलेल्या गुणांना वाव मिळाल्यास आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात शिखर गाठणे अशक्य नाही. असेच शिखर गाठण्यासाठी निघालेल्या ध्येयवेड्या युवकाने गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम पेरमिली गावातून चंदेरी दुनियेत पाय ठेवले आहे. नुकताच त्याचा ‘मी हनुमंता रिक्शावाला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून गडचिरोली जिल्ह्यातील युवक कलेच्या बाबतीतही मागे नाही हे त्याने दाखवून दिले आहे.
चिरंजीवी किष्टय्या गड्डमवार असे या नायकाचे नाव आहे. चिरंजीवी ने आज २७  नोव्हेंबर रोजी विदर्भ न्यूज एक्सप्रेस च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने चित्रपटसृष्टीपर्यंत केलेला प्रवास व चित्रपटसृष्टीत असलेला वाव याबाबत सविस्तर चर्चा केली. विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार यांनी चिरंजीवी याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर त्यांनी विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली.
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील रहिवासी असलेला चिरंजीवी याचे प्राथमिक शिक्षण पेरमिली येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. यानंतर आठवीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेतून पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी नागेपल्ली येथील राजे धर्मराव महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडील वनविभागात नोकरीवर आहेत. आई गृहीणी आहे तर चिरंजीवीला दोन लहान बहिणी आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने फोटोग्राॅफीचा व्यवसाय करून त्याने स्वतःचा खर्च भागविला. आत्ताही वेळ मिळेल तेव्हा फोटोग्राॅफीचा व्यवसाय तो करतो.  
चित्रपटात काम करण्याची संधी त्याला पहिल्यांदा समृध्दी पोरे दिग्दर्शित आणि ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आणि मंदाकिणी आमटे यांच्या जीवनकार्यावर आधारित डाॅ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो या चित्रपटापासून मिळाली. या चित्रपटात चिरंजीवी ने छोटीशी भूमिका निभावली. यानंतर त्याला चित्रपटात काम करण्याची आवड निर्माण झाली. त्याने नागपूर विद्यापीठात कला शाखेला प्रवेश घेत अभिनय कौशल्य घेतले. यानंतर विविध चित्रपटांसाठी आॅडीशन दिली. या कामासाठी त्याला स्वप्नील मामीडवार आणि प्रशांत बत्तुलवार या मित्रांची चांगली साथ मिळाली. 
मी हनुमंता रिक्शावाला या चित्रपटात चिरंजीवी ची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात रेखा शेंडे, स्वाती सारणे, राजकुमार शेंडे, प्रियंका भोते, भाउराव डोंगरे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमीत पटेल यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते विनोद जयस्वाल आहेत. चित्रपटातील गीते सरोज बिसेन, नेहा आदींनी गायले आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण गोंदिया जिल्ह्यात झाले आहे. चित्रपट विदर्भातील एकूण ३२  सिनेमागृहांमध्ये करण्यात आले आहे. गडचिरोली येथील अलंकार सिनेप्लेक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्या २८  नोव्हेंबर रोजी शेवटचे दोन शो दाखविण्यात येणार आहेत. 
पुढे बोलताना चिरंजीवी याने विविध बाबी उलगडल्या. मेहनतीचे फळ नक्कीच चांगले असते. परिस्थितीचा विचार न करता युवकांनी आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव द्यावा. कोणतेही काम मन लावून केल्यास यश दूर नाही. अपयशांना घाबरून जावू नये, असेही तो म्हणाला. भविष्यात आपणास अजय देवगण, अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यांसोबत अभिनय करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला. मराठी भाषेची अडचण असतानाही आपण मराठी चित्रपटासाठी मेहनत घेतल्यामुळे हे शक्य झाल्याचे चिरंजीवीने सांगितले. 
विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या वतीने चिरंजीवी ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी उपसंपादक होमदेव कुरवटकर, राहुल नरूले, शहर प्रतिनिधी अजय कुकडकर, आदर्श गेडाम आदी उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-27


Related Photos