मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न


- जखमी प्रेयसीला   नागपूर ला हलविले, युवकावर चिमुरात उपचार सुरु 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
 तालुका प्रतिनिधी /  चिमूर :
  मुलीच्या घरच्या लोकांनी लग्नाला विरोध दर्शविल्याने   प्रियकर मुलाने प्रेयसी वर चाकूने सपासप   १६ वार करून तिला गंभीर जखमी केल्यानंतर स्वतः विष प्राशन करून जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना  चिमूर तालुक्यातील नंदारा येथे घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी  युवतीला नागपूर ला हलविण्यात आले असून युवकावर चिमूर येथे उपचार सुरु आहे.   वृत्त लिहे पर्यत दोघेही उपचार घेत असून  घटनेची चिमूर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. पुढील तपास तपास सुरू आहे . 
  चिमूर तालुक्यातील नंदारा येथील चेतन सुरेश गजभे (वय २२ वर्ष) हा सुशिक्षित असून त्याचे गावातील चिमूर येथील नेहरू ज्युनियर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या  १८ वर्षीय युवतीवर  मागील तीन चार वर्षांपासून प्रेम होते . प्रेम सुरळीत होत असताना  प्रियकर चेतन याने मुलींच्या आई - वडिलांकडे लग्न करण्याची मागणी केली. तेव्हा  मुलीच्या आई - वडिलांनी लग्नास नकार दर्शविला . त्यामुळे तो संतप्त होऊन   प्रेम विरह झाल्याने रागाच्या भरात स्वतः सहित प्रेयसीचेही   जीवन संपविण्याच्या नादात तो दबा धरून राहत होता.  आज  २७ नोव्हेंबर ला दुपारी २ वाजताच्या  दरम्यान गावा शेजारी दबा धरून बसलेल्या चेतनने    मुलगी शाळेतून परत येत असताना तिला अडवून मारहाण करू लागला व खिशातून धारदार चाकू काढुन प्रेयशी वर सपासप वार करू लागला.  तेव्हा तिच्या सोबत असणारी तिची मैत्रीण घाबरून गावाकडे धाव घेत ओरडत गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली.   गावकरी घटनास्थळाकडे  धाव घेत पोहचले.  चिमूर पोलीस स्टेशन ला भ्रमण ध्वनी वरून माहिती दिली . दरम्यान चाकूने  वार केल्या नंतर हताश होऊन जीवन संपविण्याच्या नादात त्याने विष प्राशन केले. जखमी प्रेमीयुगुलाना पोलीस विभागाने तात्काळ धाव घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने  तिला नागपूर ला रेफर करण्यात आले तर विष प्राशन करणारा चेतन हा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.  ठाणेदार मडामे  हे पुढील तपास करीत आहेत.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-27


Related Photos