९ महिने ते १५ वर्षाखालील बालक लसीकरणापासून वंचित राहू नये : शेखर सिंह


- गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ थाटात संपन्न
-लसीकरण माहिमेची ब्रँड अँबेसिटर म्हणून एंजल देवकुळेची निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, जिल्हयातील विविध संघटना, डॉक्टर असोशिएशन, लायन्स क्लब या संस्थेच्या एकत्रीत समन्वयाने दिनांक २७ पासून डिसेंबर अखेरपर्यंत गोवर रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी समाधानकारक नियोजन केले आहे. आरोग्य विभागानी ९ महिने ते १५ वर्षापर्यंत कोणताही बालक लसीकरणाशिवाय वंचित राहू नये, याची  आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे निर्देश आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
  स्कुल ऑफ स्कॉलर विद्यालयात आयोजित  गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी  अध्यक्षीय भाषणात  ते बोलत होते.
 यावेळी  कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदच्या अध्यक्षा  योगिता भांडेकर हया होत्या तर मंचावर प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, शिक्षणाधिकारी रमेश कुचे, उपशिक्षणाधिकारी चलाख, शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, प्राचार्य निखील तुकदेव, लायन्स क्लबच्या स्मिता लडके, महिला व बाल विकास अधिकारी अनिल लांबतुरे, प्रशासकीय अधिकारी ईशा जॉनी, सामाजिक कार्यकर्ते ॲङ राम मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, भारत सरकारने सन २०२० सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  त्यानुसार आज दिनांक २७ नोव्हेंबर पासून आपल्या राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमआयोजित करण्याचे  निश्चित करण्यात आले.  यापुढेही नियमित लसिकरण मोहिम राबवून बालकांना  ९ महिने ते १५ वर्षाच्या आतील बालकांना  लसिकरण करण्यात येणार आहे.  या लसिकरणानी आरोग्यावर काही दुष्परिणाम होईल या संभ्रमात पालकांनी राहू नये, एक अत्यंत आवश्यक अशी ही लस असल्यामुळे  ती द्यावी असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ. शंभरकर यांनी प्रास्ताविकेतून  विस्तृत माहिती  यावेळी देताना म्हणाले की,  गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे, जो मुख्यत: लहान मुलांना होतो. या आजारानंतर होणाऱ्या गुंतागुतीमुळे बालकांचा मृत्यू होवू शकतो.  तसेच रुबेला हा त्यामानाने सौम्य संक्रामक आजार असला तरी गर्भवती स्त्रीयांना रुबेला आजाराचे संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नविन जन्म झालेल्या बाळाला जन्मजात दोष जसे की, अंधत्व, बहिरेपणा आणि हृदय विकृती होवू शकतो.   जिल्हयात या मोहिमेसाठी ९ महिने ते १५ वर्षापर्यंत लाभार्थी २ लाख ६६ हजार १२१ आहेत.  लसीकरण करण्यासाठी  ४४७६ आंगणवाडी केंद्र, ४७१ आरोग्य संस्था आहेत.  यामध्ये  सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर लसिकरण करण्यात येईल. या मोहिमेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक वृंदाचे मोठे सहकार्य लाभनार आहे.  पालकांनी कोणतीही भिती न ठेवता आपल्या पाल्यांना ही अत्यंत महत्वपूर्ण असलेली लस देण्याकरीता केंद्रात आणावे. अशी माहिती प्रास्ताविकेतून यावेळी त्यांनी दिली.
 यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्षा  योगिता भांडेकर आपल्या भाषणात म्हणाल्या की, जिल्हयातील सर्व म्हणजे ९ ते १५ वयोगटातील  लाभार्थ्यांना ही लस द्यावी आणि  पालकांनी आपल्या पालकांचे मनोबल सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने  वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
 स्काय मार्शल आर्ट या जागतिकस्तरावर विजेत्या ठरलेल्या  सुवर्ण पदक पारितोषिक मिळाल्या तीन विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये एंजल देवकुळे, रजत सेलोकर, सेजल गद्देवार यांचा यामध्ये समावेश आहे.  आरोग्य विभागानी  या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे ब्रँड अँबेसिटर म्हणून एंजल देवकुळे हीची निवड केली आहे.
 या शुभारंभ प्रसंगी प्रथम वेदिका म्हशाखेत्री सह चार बालकांना  लसिकरण देऊन त्यांना मुख्य अतिथिंच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.  
 कार्यक्रमाचे संचलन अमरीश उराडे यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-27


Related Photos