फलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष


- धानोरा, चामोर्शी मार्गांवर वनविभागाने लावले संदेशाचे फलक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अजय कुकडकर  / गडचिरोली :
निसर्गाचा स्वच्छतादूत म्हणून ओळख असलेल्या गिधाडांची संख्या रोडावत चालली आहे. अशाही स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाने विविध उपाययोजना राबवून गिधाडांचे संवर्धन करण्याचा निश्चय केला आहे. यामुळे वनविभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर  मोठमोठी फलके लावून नागरिकांमध्ये गिधाड संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. धानोरा आणि चामोर्शी मार्गावर ही फलके लावण्यात आली आहेत. या फलकांकडे नागरिकही आकृष्ट होवू लागले आहेत.
पूर्वी मेलेली जनावरे खाण्यासाठी गिधाडे आकाशात घिरट्या घालताना दिसून येत होती. मात्र कालांतराने शेतकरी विविध कारणांमुळे जनावरे विक्री करण्यास सुरूवात केली. तसेच अनेक गावातील ढोरफोडींवर नागरिकांनी अतिक्रमण केली. अशा अनेक कारणांमुळे मरणासन्न अवस्थेतील जनावरे कसायांना विक्री करू लागले. यामुळे आता गिधाडांचे अस्तित्व कमी होवू लागले होते. पाळीव जनावरांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध दिले जाते. ही औषधी दिलेले जनावरे मेल्यानंतर गिधाडाने खाल्यास त्याच्या शरीरात अनेक व्याधी होतात व ते मरतात. मागील १५ ते २० वर्षांमध्ये गिधाडांची संख्या ९९ टक्क्यांनी घटली आहे. अशा परिस्थितीत गडचिरोली वनविभागाने गिधाड उपहारगृह उभारून गिधाडांचे संवर्धन करण्याचा उपक्रम सुरू केला. 
गिधाडांचे संवर्धन व्हावे यासाठी वनविभागाने मारकबोडी येथे गिधाड उपहारगृह निर्माण केले आहे. या उपहारगृहात मेलेली जनावरे ठेवली जातात. मात्र मृत जनावरांवर मोकाट कुत्रे डल्ला मारत असल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी कुंपन करण्यात आले आहे. गावातील ढोरफोडीच्या जागेवर उपहारगृह उभारण्यात आले असून तारेच्या कुंपणासाठी गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे.  माल्लेरमाल, मुडझा आणि माडेतुकूम येथेही अशाप्रकारचे उपहारगृह निर्माण करण्यात येणार आहेत. कुनघाडा येथे गिधाड संवर्धन कार्यालय असून नोडल अधिकारी या कार्यालयातून कामकाज पाहतात. या उपहारगृहात मृत जनावरे आणून देणाऱ्या शेतकऱ्यास ५०० रूपये दिले जात असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. यामुळे जनावरे कसायांना न देता या भागातील शेतकरी गिधाड उपहारगृहात देत आहेत. 

गिधाड मित्रांचेही योगदान

गिधाडांचे संवर्धन व्हावे यासाठी वनविभागाने २१ गिधाडमित्रांची नियुक्ती केली आहे. त्यांना गणवेश, किट, गिधाडांची नोंद घेण्याचे साहित्य पुरविण्यात आले आहे. गिधाडमित्र सुध्दा वारंवार उपहारगृहांना भेटी देवून गिधाडांच्या हालचालींवर तसेच विविध बांबींवर लक्ष ठेवत आहेत. आतापर्यंत उपहारगृहाच्या परिसरात २०० ते २५० गिधाडांचे वास्तव्य असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. गिधाडांची संख्या वाढवून समोरील पिढीला गिधाड या पक्ष्याविषयी कुतूहल निर्माण व्हावे, यासाठी आता वनविभाग अजून पुढे जावून विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे.

सेमाना वनोद्यानात गिधाडांची भिंतीचित्रे

वनविभागाने सेमाना वनोद्यानात फिरण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांनासुध्दा गिधाड पक्ष्यांविषयी माहिती व्हावी यासाठी भिंतीचित्रे रेखाटली आहेत. पर्यटकांना भटकंती करतांना लहान मुले व शहरातील पर्यटक चित्रांकडे आकर्षित होत आहेत. लहान बालके आपल्या पालकांकडून या पक्ष्याविषयी माहिती जाणून घेताना दिसून येत आहेत.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2018-11-26






Related Photos