मृत मुलीच्या शरीरावर केले तीन दिवस उपचार, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयावर गंभीर आरोप


- मृतक मुलीच्या पालकाची पोलिसांत तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
मुलीच्या मृत शरीरावर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टरांनी तीन दिवस उपचार करून शवविच्छेदन न करताच प्रेत ताब्यात दिले, असा आरोप मृतक मुलीच्या पालकांनी केला असून याप्रकरणी सबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे. रूग्णालयावर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार वेदांती देवराव बारसकर या सात वर्षीय मुलीला ताप आला होता.  यामुळे तिला बालरोग तज्ञ डाॅ. तळवेकर यांच्या सिध्दी विनायक रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डाॅ. तळवेकर यांनी डाॅ. सचिन पावडे यांच्या रूग्णालयात भरती करा असा रेफर कार्ड दिला. त्यानुसार वेदांतीच्या पालकांनी १८ नोव्हेंबर रोजी वेदांती हिला डाॅ. पावडे यांच्या रूग्णालयात भरती केले. डाॅ. पावडे यांच्या रूग्णालयातील पर्यवेक्षकाने वेदांतीवर उपचार केले.  वेदांती रूग्णालयात पायी गेली होती, असे पालकांचे म्हणणे आहे. मात्र ती १५  मिनीटातच निपचित पडली. यानंतर डाॅ. तळवेकर यांनी तिला सावंगी येथील विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत वेदांतीचा मृत्यू झाला होता. मृत अवस्थेत वेदांतीला रूग्णवाहिकेद्वारे डाॅ. तळवेकर यांनी सावंगी येथे पाठविले. डाॅ. तळवेकर यांनी सावंगी रूग्णालयातील डाॅ. मेश्राम व डाॅ. रेवत यांच्याशी संगनमत करून वेदांतीला ३ दिवस भरती करून ठेवले. यानंतर पालकांची समजूत काढून २० नोव्हेंबर रोजी वेदांतीचे प्रेत पालकांच्या हाती दिले, असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सावंगी रूग्णालय व्यवस्थापनाने डाॅ. तळवेकर यांचे हितसंबंध लक्षात घेवून त्यांना सुरक्षित करण्यासाठी वेदांतीच्या मृत शरीरावर उपचार केले. तसेच शवविच्छेदन न करता त्वरीत अंत्यसंस्कार करून टाकण्याचा सल्ला दिला. यामुळे डाॅ. तळवेकर, कंपाउंडर अक्षय खेवले, सावंगी रूग्णालयातील डाॅ. रेवत, डाॅ. मेश्राम यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, जमिनीत पुरलेले प्रेत काढून शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी देवराव बारसकर यांनी केली आहे.
या प्रकरणाबाबत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मृतक मुलीला डेंग्यूची लागण झाली होती. भरती करतांना तिची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या पालकांनी यावेळी शवविच्छेदन करण्याची मागणी केली नाही. यामुळे शवविच्छेदन करण्यात आले नाही, असेही ते म्हणाले.

   Print


News - Wardha | Posted : 2018-11-25


Related Photos