आवळगाव परिसरात वाघाने पुन्हा घेतला बालिकेचा बळी, आठ दिवसातील दुसरी घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून १८ नोव्हेंबर रोजी पवनपार येथील महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच वाघाने आणखी एका बालिकेचा बळी घेतला आहे. सदर घटना आज २५ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
खुशी बंडू ठाकरे रा. आवळगाव असे मृतक बालिकेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार बालिका सकाळी फिरायला गेली होती. यावेळी वाघाने तिच्यावर झडप घालून ठार केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड रोष दिसून येत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत याआधीसुध्दा नागरिकांनी वनविभागावर रोष काढला होता. मागील काही दिवसात चार ते पाच नागरिकांचा वाघाने या परिसरात बळी घेतला आहे. मात्र वनविभाग गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत. काही दिवसांपूर्वी मुरपार येथे एका बालकाला वाघाने ठार केले होते. 18 नोव्हेंबर रोजी पवनवार येथील महिलेला गावातून उचलून नेले होते. तर आता आठ दिवसातच एका बालिकेला वाघाने ठार केल्याने दहशत निर्माण झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-25


Related Photos