टायर फुटल्याने कार डोहात कोसळली : पाच जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी


- कोल्हापुरातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोल्हापूर :
कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डोहात कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा मार्गावरील जोतिबा फाटा येथे पहाटेच्या सुमारास घडली . मृतांमध्ये १ महिला आणि ४ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे वृत्त प्राप्त आहे . 
 अश्विनी सुनील तांदळे (वय २६), अनिषा सुनील तांदळे (१४), श्रावणी सुनील तांदळे (३), धनश्री शशिकांत माने (७), जान्हवी सुनील तांदळे ( वय ७, सर्व रा. दत्त कॉलनी, मालगाव रोड, मिरज) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर आदर्श नितीन तांदळे (वय ५), ओम सुनील तांदळे (वय ३) या बालकांवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलराजे रुग्णालयात (सीपीआर) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 प्राप्त माहितीनुसार मिरज येथील दत्त कॉलनीमधील रहिवाशी असलेले तांदळे कुटुंबीय रत्नागिरी आणि मार्लेश्वर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यानंतर घरी परतताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा मार्गावरील जोतिबा फाटा येथे  त्यांच्या तवेरा कारचा पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यानंतर ही कार जवळच्या रेडे डोहात जाऊन कोसळली. या डोहात पाणी असल्याने कार पूर्णपणे पाण्यात बुडाली. या भीषण अपघातात कारमधील १ महिला आणि ४ अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. तर २ मुले जखमी झाले आहेत, त्यांना उपचारांसाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.  अपघातग्रस्त मोटारीतील अन्य काही प्रवासी बेपत्ता असून शोध मोहिम सुरु आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-24


Related Photos