महत्वाच्या बातम्या

 चला जाणूया नदीला अभियानात गावकऱ्यांचा सहभाग महत्वाचा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- निमसडा येथे यशोदा नदी जलपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : चला जाणूया नदीला या उपक्रमासाठी जिल्ह्यातील तीन नद्यांची निवड करण्यात आली आहे. या नद्या अमृत वाहिनी केल्या जाणार आहे. यासाठी या तिनही नदी शेजारील गावांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

देवळी तालुक्यातील निमसडा येथे अभियानातील यशोदा या नदीच्या जलपुजन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निमसडा गावच्या सरपंच शालिनी निमसडकर, देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे, धाम नदी समन्वयक सुनील राहणे, मुरलीधर बेळखोडे, भरत महोदय, दरने टाकळीचे सरपंच हेमंत इंगोले, जवादे आदी उपस्थित होते.                               

चला जाणूया नदीला या अभिायानात यशोदा नदीचा समावेश करण्यात आला आहे. या नदी काठावरील गावातील नागरिक व प्रशासनाच्या सहकार्याने पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थपणाची कामे करायची आहे. अभियानासोबतच गावाच्या विकासासाठी प्रशासनासोबत गावकऱ्यांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले.

नदी स्वच्छ ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदान करून नदीकाठ स्वच्छ करावा. नदी काठावर वृक्ष लागवड करावी. यासाठी रोहयो मधून मदत करण्यात येईल. अतिक्रमीत रस्ते मोकळे करण्यासोबतच घाण पाण्याचे व्यवस्थापन करावे. शेतकऱ्यांनी बचतगटाच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया प्रकल्प सुरू करून गावाचा विकास साधावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. रेशीम उत्पादनाला चांगली बाजारपेठ असल्याने शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे. यासाठी अनुदानावर कर्जपुरवठा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

अभियानाचे समन्वयक सुनील राहणे यांनी मनोगत व्यक्त केले. जिह्यात यशोदा नदीची लांबी ४६ किमी असून येथील नदीचे पात्र उथळ असल्याने पावसाळ्यात नदीला पूर येऊन पाणी गावात शिरते. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुरलीधर बेळखोडे, भरत महोदय, शालिनी निमसडकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यशोदा नदीच्या तिरावर नदीच्या पाण्याचे जलपूजन केले. जलपूजनाला मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गजानन कोरडे यांनी केले तर आभार प्रशांत निमसडकर यांनी मानले. कार्यक्रमला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos