श्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या वर सडलेल्या कच्च्या सुपारीच्या स्मगलिंगचा आरोप, चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
  श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या  वर तस्करीचा आरोप करण्यात आला आहे.   जयसूर्याने भारतात सडलेल्या  कच्च्या सुपारीची तस्करी  केल्याचा आरोप आहे. नागपूरमध्ये महसूल विभागाने व्यापाऱ्यावर टाकलेल्या धाडीनंतर जयसूर्यासह आणखी दोन क्रिकेटपटूंची नावं समोर आली आहेत.
महसूल संचालकांनी नागपुरात कोट्यवधी रुपयांची सडकी सुपारी जप्त केली होती. यामध्ये एका व्यापाऱ्यालाही ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, जयसूर्याचं नाव समोर आलं. या प्रकारानंतर महसूल विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने जयसूर्याला चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तो मुंबईत पोहोचला आहे. आता पुढील कारवाईसाठी श्रीलंकन सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे. सूत्रांच्या मते, दोन अन्य क्रिकेटपटूंना २ डिसेंबरपर्यंत चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.
प्राप्त  माहितीनुसार, सडलेली सुपारी इंडोनेशियामार्गे श्रीलंका आणि तिथून भारतात पोहोचली. त्यासाठी श्रीलंकेत बनावट कंपन्या बनवण्यात आल्या. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या खेळाडूंनी आपल्या ओळखीचा फायदा घेत, श्रीलंका सरकारकडून सुपारी व्यापाराचे परवाने मिळवले. त्यानंतर डमी कंपन्या बनवल्या. इतकंच नाही तर बनावट कागतपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर या सुपारीचं उत्पादन श्रीलंकेतच झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे आयात शुल्क चुकवलं गेलं. हा सर्व प्रकार महसूल विभागाच्या नागपुरातील छापेमारीनंतर समोर आला. 
नागपुरातील प्रकाश गोयल या व्यापाऱ्याचं गोदाम सील करण्यात आलं आहे. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट  जारी करण्यात आलं आहे. त्यापूर्वी मुंबईतील फारुख खुरानी नावाच्या व्यापाऱ्याला पकडण्यात आलं होतं.
भारतातील व्यापाऱ्यांनी थेट इंडोनेशियाकडून सुपारी खरेदी केली असती, तर त्यांना १०८ टक्के आयात शुल्क द्यावं लागलं असतं. मात्र दक्षिण आशिया फ्री ट्रेड एरियानुसार श्रीलंकेकडून खरेदी केल्यास आयात शुल्क द्यावं लागत नाही. त्याचाच फायदा सुपारी स्मगलिंगमध्ये उठवण्यात आला.

१०० कोटीची सुपारी २५ कोटीत

नागपुरातील व्यापाऱ्यांना सर्वाधिक फायदा सडलेली सुपारी आयात करण्यात होतो. श्रीलंकेचे व्यापारी इंडोनेशियाची सडकी सुपारी भारतीय व्यापाऱ्यांना मूळ किमतीच्या २५ टक्के कमी किमतीत विकतात. म्हणजे १०० कोटीची सुपारी २५ कोटीत घेऊन, ती सल्फरच्या भट्टीत शिजवून, देशाच्या विविध भागात विकली जाते.  नागपूर शहर सडकी आणि कच्च्या सुपारी व्यवसायाचं मोठं केंद्र बनलं आहे. सडकी किंवा कच्ची सुपारी आशियाई देशातून आणून देशाच्या विविध भागात पोहोचवली जाते. आसाममध्ये सुपारीचा मोठा व्यवसाय आहे. तिथे अनेक डमी कंपन्या आहेत. तिथे उत्पादनाची पक्की बिलं बनवून देशभरात पाठवले जातात. तिथून नागपुरातही मोठ्या प्रमाणात सुपारी येते. मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात सुपारी पाठवली जाते, जी श्रीलंकेतून बनावट बिलं बनवून आणलेली असते.  Print


News - World | Posted : 2018-11-23


Related Photos