महत्वाच्या बातम्या

 आपत्ती व्यवस्थापनामध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा : अभय यावलकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक युवतींसाठी आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.  नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या नियंत्रणाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातील 500 युवक युवतींची निवड करण्यात आलेली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातील चौथ्या बॅचचे उद्घाटन अभय यावलकर ,आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोग, नागपूर विभाग, नागपूर यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. त्यांनी आपले उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एखादी आपत्ती आल्यानंतर त्याला सर्वात प्रथम प्रतिसाद देण्याची जबाबदारी या आपदा मित्रांवर यापुढे राहणार आहे. तेव्हा योग्य वेळी योग्य मदत जर उपलब्ध झाली तर जीवितहानी सोबतच वित्तीय हानी चे देखील प्रमाण कमी होऊ शकते. त्याकरिता हा शासनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संचालक या पदावर कार्यरत असताना राज्यामध्ये उद्भवलेल्या आपत्ती तसेच त्याचे व्यवस्थापनाबद्दलचे अनुभव कथनही त्यांनी याप्रसंगी केले.  

आपल्या संचालक पदाच्या कार्यकाळाच्या दरम्यान अनेक नैसर्गिक आपत्ती उद्भवल्या होत्या तेव्हा साध्या व्हाट्सअपचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी मदत झाली होती. तेव्हा व्हाट्सअप किंवा सोशल मीडिया हे आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण साधन ठरू शकते. यावलकर पुढे म्हणाले की , महाराष्ट्र राज्य प्रशासनातील एखाद्या विभागाकडे एखादी सेवा किंवा दाखला मिळण्यासाठी अर्ज प्रलंबित असेल तर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अपील करण्याची तरतूद आहे. तेव्हा प्रशासकीय कार्यालयातील कुठले प्रलंबित अर्ज असल्यास किंवा त्यास योग्य दात मिळत नसल्यास  आपण या राज्य लोकसेवा हक्क आयोगची मदत घेऊ शकता, व या बाबत ची जनजागृती करणायचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

ते पुढे म्हणाले की ,महाराष्ट्रातील युवक युवतींनी राज्य शासनासोबतच केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षांमध्येही हिरीरीने पुढे यावे, त्याकरिता शासनातर्फे विविध विभागांमध्ये चांगली नोकरी करण्याची संधी उपलब्ध आहे , कोणतीही कठीण आपदा आल्यास मदत कार्य करणाऱ्या विविध विविध विभागासोबत योग्य समन्वय तसेच चांगले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केल्यास त्याचा कठीण परिस्थितीमध्ये चांगला उपयोग होऊ शकतो. त्याकरिता प्रत्येकाचा आपण आदर करणे शिकले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

अभय यावलकर आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग यांचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले. एस डी आर एफ, एन डी आर एफ, रेड क्रॉस सोसायटी, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन या प्रशिक्षणार्थींना लाभत असल्याचे अंकुश गावंडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे, प्रा. श्याम फाळके, सुशील दुरुगकर, किशोर सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन  जिल्हा नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयबीर यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos