शेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेला ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’ सकाळी ४.३० च्या सुमारास सोमय्या मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे. 
  राज्याच्या वेगवेगळया भागातून मोठया संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आझाद मैदान न सोडण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.  हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वाभूमीवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शेतकरी आणि आदिवासी पुन्हा मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. उन्हाळी अधिवेशनापूर्वी मार्च महिन्यात नाशिकवरून मुंबईत पायी आलेल्या शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मोर्चाने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. मात्र, त्या मागण्यांना न्याय न मिळाल्याने बुधवारी शेतकरी आणि आदिवासी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले. हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून हा मोर्चा गुरुवारी मंत्रालयावर धडकणार आहे. 
ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्य़ातील आदिवासी आणि मराठवाडय़ातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार सुमारे १८ जिल्ह्य़ांमधील १२ हजारांहून अधिक आदिवासी-शेतकरी या मोर्चासाठी मुंबईत आले आहेत. आपापल्या जिल्ह्य़ांतून मोर्चेकरी रेल्वे आणि रस्तेमार्गाने बुधवारी ठाण्यात दाखल झाले, तर काही मोर्चेकऱ्यांनी थेट आझाद मैदानात आपले बस्तान बसविले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-22


Related Photos