महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांसाठी फायद्याची वैयक्तिक शेततळे योजना


- शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : कृषि विभागातर्फे मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी कमाल ७५ हजार रूपये अनुदान देय आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी महाडीबीडी प्रणालीवर नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

नोंदणी करण्याकरिता अर्जदारांनी प्रथमत:वापरकर्त्याचे नाव (युझर आयडी) व संकेत शब्द (पासवर्ड) तयार करुन घ्यावा व आपले खाते उघडावे. अर्जदारांना वैयक्तिक शेततळे या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थी म्हणुन नोंदणी करावयाचा पर्याय उपलब्ध असेल. अर्जदारांना त्यांच्या इच्छेनुसार पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने अधिक माहितीसाठी जवळील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॉपटॉप, टॅबलेट, सामुदायीक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातुन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. त्या अनुषंगाने ऑनलाईन सोडतीद्वारे लाभार्थ्याची निवड करुन पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. या योजनेतंर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे.

योजनेकरिता अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील. जेणेकरुन वाहुन जाणारे पावसाचे पाणी नैसर्गीक प्रवाहाद्वारे शेततळ्यात साठविण्याकरीता पुनर्भरण करणे शक्य होईल. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहीक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतुन शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.





  Print






News - Bhandara




Related Photos