महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरांबाबतचा आराखडा तयार करावा : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : चंद्रपूर शहर महानगरपालिके अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती अंतर्गत घरकुल बांधण्याचे नियोजन आहे. या योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरांबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बाबतीत महाप्रीतचा प्रस्ताव आणि चंद्रपूर महानगरपालिके अंतर्गत ऊर्जा संरक्षण आणि संवर्धनसंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्यादीतचे (महाप्रीत) व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, म्हाडाच्या नागपूर येथील कार्यालयातील महेशकुमार वैमेघमाळे, नागपूर येथील पर्यटन उपसंचालक  प्रशांत सवाई, महाप्रीतचे महासंचालक प्रल्हाद महिषी आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले की, सर्वप्रथम जेथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधण्यात येणार आहेत ती जागा निश्चित करण्यात यावी. जागा निश्चित केल्यानंतर त्या जागेबाबतचा विकास आराखडा तयार करण्यात यावा तसेच याबाबतचा प्रस्ताव तयार करुन मंत्री मंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता घेण्यात यावी.

चंद्रपूर येथे श्रम साफल्य योजना राबविण्यात येत असून सदर योजना अंमलबजावणीसाठी महाप्रीत (महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्यादीत) यांच्याकडे देण्यात याव्यात. चंद्रपूर शहर महानगरपालिके अंतर्गत करण्यात येणारा सार्वजनिक पाणीपुरवठा, दिवाबत्ती, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रत तसेच वीज बचत करण्याच्या दृष्टीने अक्षय ऊर्जेचा वापर करणे व त्यासंदर्भातील संवर्धन आणि संरक्षण उपाययोजना करण्याबाबतचा आराखडा तयार करण्याबाबत निर्देश यावेळी मुनगंटीवार यांनी दिले.





  Print






News - Chandrapur




Related Photos