कापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट


- शेतकरी चिंतातूर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / येनापूर :
यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेवटच्या क्षणी पावसाने दगा दिल्यामुळे कापसाचे हाती आलेले पिक आता सुकायला लागले आहे. यामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होत आहे. या कारणामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली आहे. यावर्षी सुरूवातीला कापसाच्या झाडांना चांगली बोंडे आली. मात्र बोंडअळीने आक्रमण केले. शेतकऱ्यांनी  किटकनाशकांचा वापर करून काही प्रमाणात पिक जगविले. मात्र शेवटच्या क्षणी पावसाने दगा दिला. यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. आता पहिल्या तोडणीतच झाडे करपायला लागली आहेत. यामुळे कापूस उत्पादनात ५०  ते ६०  टक्के घट होणार असल्याचे बोलल्या जात आहे. सध्या कापूस वेचणी सुरू झाली आहे. मात्र कमी उत्पादनामुळे मजूरसुध्दा कापूस काढणीसाठी जाण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. उत्पादनात प्रचंड घट होत असल्यामुळे कापसाला योग्य दर तरी मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-19


Related Photos