देसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
दारूच्या गुन्ह्यातील चार्जशीट कोर्टात दाखल करतांना कोणताही त्रास न देण्याच्या कामाकरिता तक्रारकर्ती महिलेकडून ५ हजार लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती २ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने देसाईगंज ठाण्याच्या पोलीस हवालदार नेताजी भाऊजी मडावी यांना रंगेहाथ पकडले होते. लाचखोर पोलीस हवालदारास आज न्यायालयात हजर केले असता विशेष सत्र न्यायालयाने १९ नोव्हेंबर पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .  
तक्रारकर्ती  विरुद्ध देसाईगंज पोलिस ठाण्यात मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना कोणताही त्रास न देण्याचा मोबदला म्हणून हवालदार नेताजी मडावी याने तक्रारकर्त्याला ५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री देसाईगंज पोलिस ठाणे परिसरात सापळा रचून हवालदार नेताजी मडावी यास तक्रारकर्त्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले.  एसीबीने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७,१३(१)(अ)अन्वये देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 
पुढील तपासाकरिता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळविण्याकरिता न्यायालयात हजर करण्यात आले . न्यायालयाने आरोपीला १९ नोव्हेंबर पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-18


Related Photos