पालकमंत्र्यांच्या हस्ते 'मी हनुमंता रिक्षावाला' चित्रपटाच्या गाण्यांचे लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आदिवासी विकास, वने तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते "मी हनुमंता रिक्षावाला" या चित्रपटाच्या गाण्यांचा लोकार्पण सोहळा १५ नोव्हेंबर (गुरुवार) ला गडचिरोली येथे संपन्न झाला. संपूर्णपणे वैदर्भीय कलाकार मंडळींनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे. 
चित्रपटातील काही मुख्य कलाकार हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.  वन विभागाच्या आलापल्ली येथील स्वयंपाकी क्रिष्टपाल गड्डमवार यांचे पुत्र चिरंजीव गड्डमवार हे या चित्रपटातील मुख्य नायक आहेत. स्थानिक कलेला वाव मिळावा व त्यातून जिल्ह्यातील युवकांची सर्वांगीण प्रगती व्हावी या उद्देशाने मंत्रीमहोदयांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमाला विशेष प्राधान्य दिले. 
यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग पेरिमिली येथील युवकाने चित्रपट सृष्टीत नावारूपास येणे ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. जिल्ह्यातील युवकांमध्ये भरपूर कौशल्ये अंतर्भूत आहेत. पण त्यांना वाव मिळत नाही. त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. अशाप्रकारचे युवक पुढे आले तर माझ्या कार्याला खऱ्या अर्थाने गती मिळेल. प्रत्येकाने स्वतःतील प्रतिभा वृद्धिंगत करून सर्वांगीण वैयक्तिक प्रगती सोबतच जिल्ह्याच्या प्रगतीचा विचारही सतत करावा, असे प्रतिपादन यावेळी मंत्रीमहोद्यांनी केले. 
मंत्रीमहोदयांनी कलाकारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांना लागणाऱ्या सर्वतोपरी मदतीची पूर्तता करण्याची ग्वाही दिली. 
यावेळी मंत्रीमहोदयांचे स्वीय सहायक संजय पाणबुडे, पोलीस प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी वर्ग, तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांसोबत स्थानिक जनमानस  मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-17


Related Photos