महत्वाच्या बातम्या

 राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या 27 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून हे अधिवेशन चार आठवडे चालणार आहे. राज्याचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प 9 मार्चला सादर करण्यात येणार आहे. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले. अधिवेशन 25 मार्चपर्यंत म्हणजे चार आठवडे चालणार असून आजच्या बैठकीत 27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान होणाऱ्या विधान परिषद आणि विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. 

अधिवेशनाची सुरुवात 27 फेब्रुवारीला राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी वंदे मातरम नंतर जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिना निमित्त 8 मार्च रोजी दोन्ही सभागृहांत याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा होईल. 

विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यताप्राप्त) 5 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित) 8 अशी अंदाजे 13 विधेयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जातील. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झाली. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व्हीसीद्वारे उपस्थित होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी एक आठवडय़ाने वाढविण्यात यावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठकीनंतर बोलताना केली. दोन्ही सभागृहांतील सदस्यांना आपल्या भागातील प्रश्न मांडायचे आहेत, चर्चा करायची आहे. त्यामुळे सरकारने पळवाट काढू नये, असे अजित पवार म्हणाले.





  Print






News - Rajy




Related Photos