साडेचार हजारांची लाच स्वीकारणारा रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
खूनाच्या प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात लवकर दाखल करण्यासाठी साडेचार हजारांची लाच घेतल्याप्रकरणी शहरातील रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय लक्ष्मण गिरडकर असे लाचखोर पोलिस शिपायाचे नाव आहे. तक्रारकर्ती इंदिरानगर येथील रहिवासी असून तिच्या भावाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्याचा  लेखनिक म्हणून पोलिस शिपाई अजय गिरडकर हा काम पाहतो.   तक्रारकर्तीने गिरडकर याची भेट घेतली. यावेळी त्याने कागदपत्रे आपणाकडेच असून लवकर न्यायालयात दोषारोप सादर करण्यासाठी ५ हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. याबाबत तक्रारकर्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने ३०  आॅक्टोबर रोजी रामनगर पोलिस ठाण्यात पडताळणी केली असता आरोपी अजय गिरडकर याने ५ हजारांची लाच मागणी करून तडजोडीअंती ४ हजार ५००  रूपयांची लाच स्वीकारली. यावरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-16


Related Photos