महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा : कुरुड डांबरीकरण रस्त्याची दैनावस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : कोंढाळा वरून कुरुड मार्गे जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याची दैनावस्था झाली असून या ठिकाणाहून वाहनधारक सायकलस्वार बैलबंडीधारक शेतकरी यांना जीव धोक्यात घालून ये-जा करण्यास त्रास सहन करून तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुरुड या ठिकाण राईस मिल प्राथमिक आरोग्य केंद्र व आजुबाजुला शेतकऱ्यांची शेत असल्याने कोंढाळा वरून कुरुड मार्गे दररोज ये- जा करावी लागते. परंतु डांबरीकरण रस्ता काही ठिकाणाहून पूर्णपणे उखडून गेल्याने रस्त्यावरील डांबर दिसेनासा होऊन डांबरीकरण रस्ता भुईसपाट झाला आहे.

रस्ता भुईसपाट झाल्याने गिट्टी वर येऊन डोके काढून पाहू लागली आहे. त्यामुळे एखादे वेळेस वाहनधारक वा सायकलस्वार यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डांबरीकरण रस्त्याचे काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देसाईगंज तर्फे काम करण्यात आले. सदर कामावर अंदाज पत्रकिय तरतुदीनुसार १५ लाख ५६ हजार ७०८ रुपये खर्च करण्यात आले. मात्र डांबरीकरण रस्ता गावाबाहेर असल्याने त्या ठिकाणी डांबर व इतर साहित्यांचा योग्य प्रमाण न वापरला गेल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे निदर्शनास येते. तसेच याच ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले मात्र खड्डे एकीकडे व काम दुसरीकडे असा प्रकार दिसून येत असल्याने लाखो रुपये खर्च करूनही डांबरीकरण रस्ता जैसे थे अवस्थेत झाला असल्याचे दिसून येत आहे. याकरिता या रस्त्याकडे दुर्लक्ष न करता वा हलकी फुलकी डागडुजी न करता योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos