महत्वाच्या बातम्या

 लोकबिरादरी आश्रम शाळेच्या खेळाडू मुली रिलेत राष्ट्रीय स्तरावर धावणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भामरागड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत नुकत्याच घेण्यात आलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील खेळाडू विद्यार्थींनीचा ४×४०० रिलेचा संघ सुवर्ण पदकासह विजयी झाला आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सदर विद्यार्थीनीं राष्ट्रीय स्तरावर धावणार आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे द्वारा आयोजित राज्य स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा-२०२२-२३, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे -बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच पार पडल्या. यामध्ये लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील १९ वर्षे वयोगटातील मुलींचा ४×४०० मी. रिलेचा संघ सहभागी झाला होता. ४ मिनिटे २४ सेकंद वेळ नोंदवित सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.

संघात जमुना मज्जी, लक्ष्मी पुंगाटी, मुन्नी मडावी व लाली उसेंडी या खेळाडू विद्यार्थीनीचा समावेश आहे. जेष्ठ समाज सेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे, मुख्याध्यापक श्रीराम झोडे, सर्व शिक्षक व प्रकल्पातील कार्यकर्ते यांनी प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक विवेक दुबे यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos