महत्वाच्या बातम्या

 वाहनचालकांनी दंडाची रक्कम त्वरित भरणे गरजेचे : अन्यथा दंडात्मक कारवाई


- ७.५२ कोटींचा दंड भरा नाही तर लोकअदालतीला हजर रहा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : वाहन चालविताना अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. सिग्नलवर वाहतूक पोलिस दिसला नाही की अनेकजण सिग्नल तोडून निघून जातात. अशा वाहनचालकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा वाहतूक पोलिसांनी मोबाइलमध्ये घेतलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून ई- चलान पाठविण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले आहे. ई-चलान पाठविल्यानंतर ते न भरल्यास संबंधित वाहनचालकाला समन्स पाठविण्यात येत असून, त्यांना लोकअदालतीला हजर रहावे लागणार आहे.


 एकूण दंड ९.७३ कोटी, थकबाकी ७.५२ कोटी

जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविले आहे. यातील केवळ २ लाख २१ हजार १७८ वाहनचालकांनी हे ई-चलान भरले असून अद्यापही ७ लाख ५२ हजार ७६१ वाहनचालकांनी ई-चलान भरले नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

कुठे भराल दंड?

वाहतूक पोलिसांनी ई-चलान पाठविल्यानंतर संबंधित वाहनचालक डिव्हाइस उपलब्ध असलेल्या वाहतूक पोलिसाकडे दंड भरू शकतात. दंड न भरलेल्या वाहनचालकांना न्यायालयात पाठविण्यात येते. असे वाहनचालक न्यायालयात दंड भरू शकतात. याशिवाय वाहतूक परिमंडळातही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

दंड न भरल्यास काय होणार?

दंड न भरल्यास वाहनचालकांच्या नावे न्यायालयातून समन्स काढण्यात येतो. समन्स काढून दंड न भरलेल्या वाहनचालकांना लोकअदालतीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात येते. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी दंडाची रक्कम त्वरित भरणे गरजेचे आहे.

मुदतीत दंड भरून संभाव्य कारवाई टाळावी

वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड आकारण्यात आल्यानंतर तो दंड मुदतीच्या आत भरणे आवश्यक आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येते. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी मुदतीच्या आत दंड भरणे आवश्यक आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos