आदिवासी विकास महामंडळातर्फे मौशिखांब येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब


- १५ दिवसाआधी आदेश मिळूनही धान खरेदीस प्रारंभ नाही
- शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे धान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
तालुक्यातील मौशिखांब येथील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुरू केले जाणारे धान खरेदी केंद्र दिवाळी सण गेल्यानंतरही सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे शेतकर्यांना धान विक्रीसाठी वाट पहावी लागत आहे. काही शेतकरी कमी दरात व्यापाऱ्यांना धान विक्री करीत आहे. यामुळे धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शासनाने दिवाळीआधी सर्व धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून सर्व संस्थांना पत्र देण्यात आले होते. जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्र १ नोव्हेंबर रोजीच सुरू करण्यात आले. मात्र मौशिखांब येथील धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी धान कुठे विक्री करावा, असा प्रश्न पडला होता. काही शेतकऱ्यांनी मातीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विक्री केली. सध्या हलक्या आणि मध्यम प्रजातीच्या धानाची मळणी पूर्ण झालेली आहे. यामुळे शेतकरी घरी धान साठवून खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट बघत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे सातत्याने दूर्लक्ष केले जात आहे. तातडीने धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-14


Related Photos