कुपोषण निर्मुलनासाठी पोषणद्रव्ये युक्त तांदूळ रास्त भाव दुकानातून: उद्या आरमोरी येथे शुभारंभ


- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिष बापट येणार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  :
आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी पोषणद्रव्ये युक्त तांदूळ वितरणाचा महत्वाकांक्षी उपक्रम गडचिरोली जिल्हयात सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रास्त भाव दुकानांच्या मार्फत सुरु होत आहे.  याचा शुभारंभ उद्या १५ नोव्हेंबर रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते आरमोरी येथे होणार आहे.
गडचिरोली जिल्हयात राबविण्यात येणारा हा प्रायोगिक तत्वारील उपक्रम राबविण्यासाठी टाटा ट्रस्टची मदत प्राप्त झाली आहे. शुभारंभाच्या या कार्यक्रमास राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. खासदार अशोक नेते,   जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, ना.गो. गाणार, अनिल सोले,  आमदार डॉ. देवराव होळी, क्रिष्णा गजबे,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 रास्तभावाने पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ

देशात आणि राज्यात ॲनिमियाचे प्रमाण खूप मोठया प्रमाणात आहे. सन 2015-16 च्या चौथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील 53.08 टक्के मुलांमध्ये (वय 6 महिने ते 5 वर्ष), 15 ते 49 वर्ष वयाच्या महिलामध्ये 48 टक्के व गर्भधारक महिलांमध्ये 47.9 टक्के इतक्या मोठया प्रमाणात ॲनिमिया झाल्याचे दिसून आले आहे.
ॲनिमिया प्रामुख्याने रोजच्या जेवणात Vitamin A, B 9/ फॉलेट व B 12  या पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येते, संशोधनाने हे सिध्द केले गेले आहे की, जर पुरेषा प्रमाणात जेवणातून लोह व इतर पोषक द्रव्य दिल्यास ॲनिमिया मोठया प्रमाणात नियंत्रणात आणता येते. सद्यस्थितीमध्ये लोहयुक्त गोळया देणे इत्यादी पर्यायाने शासनामार्फत ॲनिमिया नियंत्रणाचा प्रयत्न होत आहे. परंतु त्याला वेगळया पुरवठा व्यवस्थेची आवश्यकता आहे.
वरील समस्यांवर उपाय म्हणुन पोषणतत्व युक्त गुणसंवर्धीत तांदूळ बनविण्याचा विचार करता येऊ शकतो.  टाटा ट्रस्ट राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा वापर करुन स्थानिक स्तरावर प्रक्रिया केलेले
 भाताचे दाणे ज्याला  Fortified Race Kernel  अर्थात FRK म्हटले जाते की जे तांदळाच्या पीठापासून बनलेले असतील व मोठया प्रमाणात लाहयुक्त असतील.  तसेच त्यांच्यामध्ये इतर सुक्ष्म पोषकद्रव्ये फॉलीक ॲसी व बी 12 युक्त सुध्‍दा असतील.  तसेच या तांदळाच्या दाण्याचा आकार प्रचलित दाण्यासारखाच असेल. हे दाणे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या प्रचलीत तांदळात 1 एफआरके ला 100  या प्रमाणात मिसळले जातील.  एफआरके हे चव आणि आकाराने प्रचलित तांदळासारखेच असतील. व अशा मिश्रित तांदळाचा भात बनवितांना कोणतीही दुसरी प्रक्रिया करावी लागणार नाही. या उपाययोजनेचा वापर करताना अंतिम लाभार्थ्यांच्या वर्तणुकीत कोणताही बदल करावा लागणार नाही.
कुपोषण व ॲनेमिया या समस्यांना तोंड देण्यासाठी अन्नधान्याचा दर्जा हा महत्वाचा आहे. त्यासाठी आवश्यक पोषणमुल्ये हे नितांत गरजेचे आहे.  सदर समस्यांच्या निवारणासाठी राज्यात रास्तभाव दुकानामार्फत फोर्टिफाईड  मीठाचे वितरण सुरु करण्यात आले असून ते बाजार भावापेक्षा वाजवी दरात म्हणजेच 14 रुपये प्रति किलो या दराने वितरण करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा पुढील भाग आज रोजी फोर्टिफाईड तांदूळ रास्तभाव दुकानामार्फत देण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहूल क्षेत्रामध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याने या क्षेत्राची प्राथम्याने निवड करण्यात आली आहे.
सदर फोर्टिफाईड राईस वितरणाचा प्रकल्प टाटा ट्रस्टच्या मदतीने गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा व भामरागड या दोन्ही तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे.  सदर प्रकल्प राबविण्याबाबत जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी टाटा ट्रस्ट सोबत करार केला आहे. त्यानुसार सदर प्रकल्प राबवून राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबाबत प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहेत.
या वितरणासाठी गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा आणि भामरागड तालुक्याची पहिल्या टप्प्यात निवड झाली.  हा तांदूळ रास्त भाव दुकानांमधून बाजारभावापेक्षा कमी दरात म्हणजे 14 रुपये किलो दराने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी पोषणद्रव्य पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ  वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रास्त भाव दुकान च्या मार्फत सुरू होत आहे.  याचा शुभारंभ राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री गिरीश बापट यांच्या हस्ते आरमोरी येथे होईल.  गुरुवार  15 नोव्हेंबर  रोजी दुपारी 12.00 वाजता, जेना ॲग्रो राईस मिल, आरमोरी येथे  या  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास मोठया संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह  आणि जिल्हा पुरवठा अधिकारी एस. पी. खलाटे यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-14


Related Photos