घरकामाला आणलेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
: घरकामाला आणलेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा छळ करणाऱ्या तिघांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शैलेष झा (वय ५०) असे या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव असून, अन्य आरोपींमध्ये शालिनी अमित झा (वय ३०) तसेच अमित झा (वय ३५) यांचा समावेश आहे. हे दोघे  मुख्य आरोपींचे  मुलगी आणि जावई आहेत.  सदर घटना महाराजबाग जवळच्या पत्रकार सहनिवासात  नऊ महिन्यांपूर्वी घडली.
आरोपी शैलेष झा हा पाटणा (बिहार) येथील मूळ निवासी असून, तो वकिली करायचा. त्याने नंतर वकिली सोडली. डिसेंबर २०१७ मध्ये तो नागपुरात मुलीच्या घरी आला होता. तर, जानेवारी २०१८ मध्ये त्याने त्याच्या नात्यातील १५ वर्षीय मुलगी येथे घरकामाला आणली. ती मुलगी त्याला काका म्हणायची. शालिनी आणि अमितच्या सदनिकेत ती घरकाम करून तेथेच राहायची. पोलिसांच्या माहितीनुसार, घरकामात चूक झाल्यास ते तिला मारहाण करायचे. तिला घराबाहेर काढून द्यायचे. फेब्रुवारीमध्ये शालिनी आणि अमित गोव्याला फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपी शैलेष झा आणि पीडित मुलगी असे दोघेच घरी होते. ती संधी साधून आरोपी शैलेषने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला धमकी देऊन गप्प बसवले. त्यानंतर तिचा छळ जास्तच वाढला. ती छळाला कंटाळली होती. सोमवारी दुपारी तिला अमितने सिगारेट आणण्यासाठी बाहेर पाठविले. ती म्हाडा कॉलनी जवळच्या खासगी बसथांब्याजवळ आली आणि तेथे रडत बसली. त्याच वेळी महिला-मुलींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या मुलींनी तिला बघितले. तिची विचारपूस केल्यानंतर तिने आपली छळकथा त्यांना सांगितली. त्यामुळे त्यांनी तिला सीताबर्डी ठाण्यात आणले. ठाणेदार हेमंत खराबे यांनी मुलीला दिलासा देऊन तिची चौकशी केली असता तिने बलात्कार आणि त्यानंतरही तिचा झा परिवाराकडून कसा छळ होतो, ते सांगितले. तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी शैलेषविरुद्ध बलात्कार तसेच शालिनी आणि अमितविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला.    Print


News - Nagpur | Posted : 2018-11-14


Related Photos