भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्यास ७ वर्षांचा सश्रम कारावास


- एक हजाराचा दंडही ठोठावला, गडचिरोली येथील न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
दारू पिऊन मुलीला शिवीगाळ करीत असलाना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शेजारील महिलेवर कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याप्रकरणी आरोपीस गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र आर. शर्मा यांनी सात वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
गणेश रामाजी शिडाम रा. भामरागड असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी गणेश हा आपली सावत्र मुलगी सुनंदा शिडाम हिच्यासोबत नेहमीच वाद घालायचा. १९ डिसेंबर २००९ रोजी त्याने सुनंदा हिच्याशी वाद घालून वाईट शब्दात शिवीगाळ केली. यावेळी घराशेजारी राहणारी रेखा श्रीहरी धानोरकर हिने आरोपीला वाईट शब्दात का बोलतोस म्हणून मध्यस्ती केली. यावेळी आरोपी गणेशने घरातून कुऱ्हाड आणून तिच्यावर वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला भामरागड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर नागपूर येथील व्होक्हार्ट हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. पिडीतेची मुलगी भाग्यश्री धानोरकर हिने याबाबत भामरागड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून आरोपीविरूध्द कलम ३०७ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारतर्फे जखमी रेखा व इतर साक्षीदारांचे बयाण नोंदविण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आज १३ नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश शिडाम याला याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेवून पोलिसांनी ९ महिन्यांपूर्वी अटक केली होती. 
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम बघितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-13


Related Photos