महत्वाच्या बातम्या

 बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा


- अन्यथा दत्तक मुक्त घोषित करणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील राज नावाच्या बालकाला दत्तकमुक्त घोषित करण्यात येणार असून त्याच्या संबंधित पालकांनी सात दिवसांच्या आत बालकाबाबत आपला हक्क दाखविण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.

भद्रावती येथील चंडिका माता मंदिराच्या मागील बाजूस मेन रोडवर गॅरेजच्या समोर कपड्यात गुंडाळलेले एक दिवसाचे नवजात बालक 8 नोव्हेंबर 2022 रोजी आढळून आले. सदर बालकाच्या हात पायाची एकूण 24 बोटे आहेत. भद्रावती पोलीस स्टेशन येथे सदर बालकाबाबत एफ.आय.आर नोंदवून त्या नवजात बालकाला उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे दाखल करण्यात आले. त्याचदिवशी सदर बालकास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारार्थ एन.आय.सी.यु वार्डात दाखल करण्यात आले.

सदर बालकाची प्रकृती चांगली झाल्यानंतर पोलिसांनी 14 नोव्हेंबर 2022 रोजी अर्ज देऊन बालकाला बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर उपस्थित केले. त्या बालकाचे नाव राज असे नोंदवून त्या बालकाला महिला विकास मंडळ द्वारा संचालित, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजना, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.

संबंधित बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत बालकल्याण समिती, शासकीय मुलाचे निरीक्षण गृह/ बालगृह, डॉ. राजेंद्र आल्लूरवार बिल्डिंग शास्त्रीनगर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षद्वारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला जिल्हा स्टेडियमजवळ अथवा महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना डॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ रामनगर, चंद्रपूर या पत्त्यावर संपर्क साधावा. व सदर बालकाबाबत आपला हक्क दाखवावा. अन्यथा बाल कल्याण समिती त्या बालकास दत्तक मुक्त घोषित करेल, आणि महिला विकास मंडळद्वारा किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करेल. याची नोंद संबंधित पालकांनी घ्यावी, असे जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूरद्वारे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos