महत्वाच्या बातम्या

 आदर्श महाविद्यालयात एबीसी नोंदणी दिनाचे आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / देसाईगंज : नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीचा एक भाग म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी डीजी लॉकर मध्ये त्यांचा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे खाते उघडून स्वतःची एबीसी आयडी तयार करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. गोंडवाना विद्यापीठाने तसे पत्र संलग्नित सर्व महाविद्यालयांना दिलेले आहे. त्यानुसार 31 जानेवारी हा दिवस एबीसी नोंदणी दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एबीसी नोंदणी दिनाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे समन्वयक, डॉ. श्रीराम गहाणे हे उपस्थित होते. डॉ. श्रीराम गहाणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या डीजी लॉकरचे महत्त्व समजावून सांगितले.

एखाद्या बँकेत आपले लॉकर उघडून आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित रहाव्या म्हणून जसे ग्राहक या लॉकरचा वापर करतात अगदी तसेच विद्यार्थ्यांसाठी या लॉकर चे महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची जून 2023 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असून यानंतर विद्यार्थ्यांना कोणतीही पदवी, प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक हार्डकोपीमध्ये दिली जाणार नाहीत, तर त्यांनी कमाविलेले सर्व क्रेडिट्स त्यांच्या पदवी, प्रमाणपत्र, गुणपत्रक हे संबंधित विद्यार्थ्यांच्या डीजी लॉकर मध्ये जमा केले जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये नोंदणी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर गहाणे यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शंकर कुकरेजा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण 2020 मधील विविध संधी याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसनही केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल बोरकर यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार प्रा. निलेश हलामी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. श्रीकांत पराते प्रा. दिपाली महिंद प्रा. वैशाली बोरकर यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos