महत्वाच्या बातम्या

 बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आपल्या गावातच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास रु. 2 हजार प्रती हप्ता या प्रमाणे रू. 6 हजार प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या 13 व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने 13 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत 14.32 लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात 13 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल. सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. 

आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही. पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबी मार्फत दिनांक 01 फेब्रुवारी, 2023 ते 12 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत राज्यात यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहान विकास पाटील कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos