महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापकाचे खेळाडू विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन


-  पीडित विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करून केली कारवाईची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : चेन्नई येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.

गोंडवाना विद्यापीठाकडून २५ जानेवारीरोजी चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींची चमू पाठविण्यात आली होती. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक विजय सोनकुवर हे होते. मात्र, या दोघांनी चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले. इतक्यावरच न थांबता अमरावती व मुंबई विद्यापीठातील मुलींसोबत देखील चार्जर मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केले. पूर्ण वेळ हे दोघे दारूच्या नशेत असायचे. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. स्पर्धा संपवून परत आलेल्या मुलींनी सोमवारी तत्काळ प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.

कोणत्याही विद्यापीठातील महिला खेळाडूंना स्पर्धांसाठी परगावी पाठविताना महिला प्रशिक्षक किंवा सहकारी देणे आवश्यक आहे. मात्र, गोंडवाना विद्यापीठाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोबतच प्रशिक्षक सोनकुवर यांच्यावर खेळाडूंच्या चमुसोबत जाण्यास दोन वर्षांपासून बंदी देखील आहे. तरीही त्यांना मुलींसोबत पाठविण्यात आले. तक्रार करण्यासाठी विद्यापीठात आलेल्या मुलींसोबत विजय सोनकुवर यांनी पुन्हा गैरवर्तणूक करीत बघून घेण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे दोषी प्रशिक्षक व व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos