महत्वाच्या बातम्या

 वर्धा येथे मुख्य सभामंडपात बुधवारला सत्यपाल महाराज यांचे खंजिरी भजनाचे आयोजन


- गुरुवारी सामुदायिक प्रार्थना व भजन

- ग्रंथ दालनाचे आदल्या दिवशी उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान होत असले तरी प्रत्यक्ष सुरुवात मात्र बुधवार १ फेब्रुवारीला सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या खंजिरी भजनाने होणार आहे.

३ ते ५ फेब्रुवारी या दरम्यान परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिचर्चा, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद, विशेष कार्यक्रम, खुले अधिवेशन असे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु या संमेलनात पहिल्यांदाच प्रत्यक्ष संमेलन सुरु होण्याच्या दोन दिवस आधीपासुनच साहित्य रसिकांना विविध कार्यक्रमांची मेजवाणी राहणार आहे.

बुधवार १ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता मुख्य सभामंडपात सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे खंजिरी भजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमापासुन खऱ्या अर्थाने संमेलनास सुरुवात होईल. संमेलनात राज्य व राज्याबाहेरुन येणाऱ्या साहित्य रसिकांसाठी ग्रंथदालन प्रमुख आकर्षण असते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभानंतर या दालनांचे उद्घाटन होऊन ती खुली केली जातात. वर्धा येथील संमेलनात मात्र वेगळेपण जपत आणि ग्रंथ दालने वाचकांना पूर्णवेळ उपलब्ध व्हावे, यासाठी २ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलनस्थळी पुस्तकांच्या प्रकाशनांसाठी ६० बाय ८० फुटाचा स्वतंत्र मंडप तयार करण्यात आला आहे. या मंडपास ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंच असे नाव देण्यात आले, असून या मंचाचे उद्घाटन देखील २ फेब्रुवारी रोजी ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर होईल. ग्रंथप्रदर्शन व प्रकाशन मंचाचे उद्घाटन मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्याहस्ते होणार आहे.

याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना व खंजिरी भजन देखील होणार आहे. सामुदायिक प्रार्थना प्रकाश महाराज वाघ व भजन भाऊसाहेब थुटे हे सादर करतील. या सर्व कार्यक्रमांचा साहित्य रसिक व वर्धाकर नागरिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  





  Print






News - Wardha




Related Photos