नक्षल्यांना पुरवत होते साहित्य : १३ जणांना अटक


-गोंदिया बालाघाट पोलिसांनी संयुक्त कारवाई 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
नक्षल्यांना साहित्य पुरवठा केल्याप्रकरणी गोंदिया -बालाघाट पोलिसांनी संयुक्त कारवाई करता १३ जणांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षली आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात करीत असून त्या भागात नक्षल कारवाया करणाऱ्या नक्षल्यांना काहीजण साहित्य पुरवीत असल्याची माहिती मिळाली असता  गेल्या आठवड्यात ८ व्यक्तींना किरनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील दोघांचा समावेश होता. त्यातच या प्रकरणाचा तपास करतांनाच किरनापूर पोलिसांना आरोपीकंडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर गोंदिया येथील वचन विजय खंडारे याला ९ जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यापुर्वी ८ जुलै रोजी किरनापूर तालुक्यातील बोरबन येथील निवासी वरजूर गणपत उईकेला ताब्यात घेत चौकशी सुरु केली असून या नक्षल साहित्य पुरवठा प्रकरणात आरोपींची संख्या १३ झाली आहे. तर बालाघाट पोलिसांनी याच प्रकरणात चौकशीकरीता गोंदियातील एका माजी नगरसेवकासह २ व्यक्तींना अटक केली असून गोंदियातील ६ व्यक्ती या प्रकरणात अटकेत आहेत.
 नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे. छत्रसाल उर्फ बंटी मोहन बानेवार (४८) रा. माडी मोहल्ला चावडी चौक छोटा गोंदिया, लक्ष्मीनारायण उर्फ बाळू दिगंबर कुंभारे (५३) रा. साई खापर्डे कॉलनी कुडवा व राजेश गोपीचंद पाटील (५१) रा. आंबेडकर चौक कुडवा या तिघांना अटक केली आहे.
नक्षल्यांना शस्त्र पुरविणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केली होती. त्या घटनेचे धागेदोरे गोंदियापर्यंत लागले. त्यावेळी गोंदियातील घनश्याम आचले व विजय कोरेटी या दोघांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात गोंदियातील आणखी तिघांना नक्षल समर्थक म्हणून अटक करण्यात आली आहे. बालाघाट जिल्ह्याच्या किरनापूर-किनी जंगलात नक्षल्यांना शस्त्र पुरवठा करण्यासाठी फिरत असलेल्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी अटक केली होती.
यावेळी आरोपींकडून तीन पिस्तूल, तीन मॅक्झिन, एके ४७, आठ मोबाईल, चारचाकी असलेले दोन वाहने, एलईडी टॉर्च, हवा पंप, एमपीथ्री प्लेयर, पर्स, सुटकेस, कापड भरलेल्या तीन बॅग असा सामान जप्त करण्यात आला होता. नक्षल्यांना पावसाळ्यापूर्वी ५ हजार काडतुसे, पिस्तूल, शस्त्रे दारुगोळा, शिबीर लावण्याचे साहित्य पुरविण्यासाठी एक कोटी रुपयांचा सौदा झाला होता. यातील ३० लाख रुपयाचे सामान मागील सहा महिन्यात नक्षल्यांना  पुरविल्याची माहिती आहे. या प्रकरणात नक्षल समर्थक म्हणून काम करणाऱ्या गोंदियातील तिघांना अटक करण्यात आली. 
सदर कारवाई गोंदिया बालाघाट पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, बालाघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी, नक्षल विरोधी अभियान पथक गोंदियाचे शरद पाटील, बालाघाटचे पीएसआय उके यांनी केली आहे.यातील मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीच्या सुचनेवरुन लपवून ठेवण्यात आलेले साहित्यासाह १ बंदुक व ४९० काडतूस चौकशीदरम्यान हस्तगत करण्यात आले असून बोरबन जंगल परिसरातून हे साहित्य नक्षल्यापर्यंत पोचविण्यात येत असल्याचे समोर आले आहे.




  Print






News - Gondia | Posted : 2021-07-14






Related Photos