टी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता केले ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ
:  यवतमाळ येथील पांढरकवडा मधील टी-१ वाघिणीला शुक्रवारी  रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी तिला गोळी घालून ठार करण्यात आले. तब्बल एक वर्षांपासून जगण्यासाठी सुरू असलेला तिचा संघर्ष संपला. पाच वर्षांच्या या वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता ठार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. प्राणीप्रेमींकडून वाघिणीच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात येत असून, चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हैद्राबादचा नेमबाज नवाब शफात अली खान यांचा मुलगा असगरने वाघिणीला गोळी घातली. यावेळी एकही पशुवैद्यक त्याच्यासोबत नव्हता. वनखात्याकडून यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. वाघिणीला शांततापूर्ण मार्गाने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करा असे या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ही वाघीण गावाच्या सीमेजवळ दिसल्यामुळे आणि गावकऱ्यांवर हल्ला करण्याची भीती वाटल्यामुळे तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण ती चमूवर धावून येताना दिसल्यामुळे गोळी घालण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, टी-१ वाघिणीच्या शरीरावर असलेल्या डार्ट वरून तो हाताने लावल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक चाचणीनंतर ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या चाचणीची मागणी पशुवैद्यकांकडून होत आहे. या वाघिणीवर शनिवारी नागपुरातील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछड्याना बेशुद्ध करून पकडण्यासाठी वनखात्याची चमू पांढरकवडा येथेच तळ ठोकून आहे. वाघिणीला ठार केल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटून आनंद साजरा केला.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही वन्यप्राण्याला बेशुद्ध करता येत नाही किंवा गोळी घालता येत नाही. परिस्थिती खूपच वाईट असेल तर अपवादात्मक प्रकरणात प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन तसे करता येते.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-04


Related Photos