एमगिरी’त महिलेचा विनयभंग


-उपसंचालकांविरुद्ध पोलिसात तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
येथील ‘महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण’ या गांधी विचारांवर काम कारणाऱ्या संस्थेतील एका महिलेवर संस्थेच्याच उपसंचालकांनी बळजबरी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून महिलेने सर्व दबाव झुगारून पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 
केंद्रीय लघु मंत्रालयाअंतर्गत कार्यरत व ‘एमगिरी’म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संस्थेतील हा प्रकार घडूनही संस्थेच्याच कर्त्यांधर्त्यांनी आरोपीची पाठराखण चालवल्याने पीडित महिलेस पोलिसांचा उंबरठा चढावा लागल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पीडित महिला संस्थेच्या ‘रेडिओ एमगिरी’ या उपक्रमात उद्घोषिका म्हणून कार्यरत आहे. या उपक्रमाची जबाबदारी उपसंचालक  डॉ. के. व्यंकटराव सांभाळतात. त्यांनी महिलेला आपल्या कक्षात बोलावले व बळजबरीचा प्रयत्न केला. घाबरलेल्या महिलेने आपल्या हितचिंतकांना ही बाब सांगितली. त्यांच्याच सल्ल्यानुसार ‘विशाखा’ समितीकडे तक्रार केली, परंतु यानंतर  तिचा छळच सुरू झाला. नोकरीवरून काढून टाकण्याबाबत धमकावण्यात आले. अखेर या महिलेने ३१ ऑक्टोबरला रामनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. डॉ. राव यांच्यावर विनयभंगाचा अजामिनपात्र गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात डॉ. राव यांच्याशी त्यांच्या दोनही भ्रमणध्वणीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. संस्थेचे संचालक डॉ. आर.के. गुप्ता यांनी पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे नमूद करीत अधिक भाष्य टाळले. ‘विशाखा’ समितीच्या अध्यक्ष  प्रगती गोखले म्हणाल्या, आम्ही तक्रारीवर त्याच दिवशी चर्चा केली.
नियमानुसार आरोप झालेल्या व्यक्तीस खुलासा करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली जाते. ती अद्याप पूर्ण व्हायची आहे. पण, पोलीस तक्रार झाल्याने आम्ही चौकशीत हवी ती माहिती देऊ. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. निखिल पिंगळे म्हणाले, गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस अधिकारी याप्रकरणी चौकशी करीत आहेत.  Print


News - Wardha | Posted : 2018-11-03


Related Photos