भारत-फ्रान्स औद्योगिक सहकार्याचे नवे पर्व नागपूर-विदर्भातून सुरु करावे : देवेंद्र फडणवीस


- भारत-फ्रान्स औद्योगिक सहकार्याचे नवे पर्व
-  विविध उद्योग उभारणीसंदर्भात १२ सामंजस्य करार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
ड्रायपोर्ट व समृद्धी महामार्गामुळे पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार आहे. विदर्भात उद्योगासाठी सर्वात कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फ्रान्सने नागपूर-विदर्भातील उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढाकार घेऊन भारत-फ्रान्स औद्योगिक सहकार्याचे नवे पर्व नागपूर-विदर्भातून सुरु करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे ‘इंडो-फ्रेन्च इन्व्हेस्टमेंट समिट-कॉनक्लेव्ह’चे इंडो-फ्रान्स चेंबर ऑफ कॉमर्स व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर, इंडो-फ्रान्स चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. यांग आदी उपस्थित होते. यावेळी भारत व फ्रान्स दरम्यान विविध औद्योगिक क्षेत्रातील 12 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशामध्ये विदर्भाचे आणि प्रामुख्याने नागपूरचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. नागपूर देशाच्या मध्यभागी असल्याने देशातील सर्व क्षेत्रांशी समान अंतराने जोडले जाते. नागपूर व विदर्भाच्या सर्वांगिण विकासावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व अन्य औद्योगिक शहरांप्रमाणेच नागपूर येथेही उद्योग क्षेत्रात विपुल संधी आहेत. आगामी पाच वर्षात विदर्भ तसेच नागपूरमध्ये नामांकित कंपन्या प्रस्थापित झालेल्या असतील. मागील पाच वर्षामध्ये 20 हजार किलोमीटरचे महामार्ग उभारण्यात आले आहेत. याचा संपूर्ण राज्याला लाभ होणार आहे. देशात व राज्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे क्रांतिकारक बदल घडत आहेत. नागपूर-मुंबई दरम्यान उभारण्यात येणारा समृद्धी महामार्ग आर्थिक संपन्नतेचा पाया ठरणार आहेत. सिंदी येथील ड्रायपोर्टद्वारे देशातील प्रमुख औद्योगिक शहरे जोडली जाणार असल्याने उद्योगास चालना मिळणार आहे. या अंतर्गत कृषीपूरक उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार असल्याने हा महामार्ग सर्वार्थाने उपयुक्त ठरणार आहे. नागपूर विमानतळाचा विकास करण्यात येणार असून ‘कार्गो’साठी येथे स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार आहे. रेल्वेसाठी लॉजिस्टीक हबही उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटीच्या उभारणीमध्ये फ्रान्सचे मोठे सहकार्य लाभत असून यामध्ये शाश्वत विकासाच्या संदर्भातील सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. ‘इज ऑफ डुईंग’मध्येही महाराष्ट्र अग्रेसर असल्याने औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी फ्रान्सचे राज्यात सदैव स्वागतच आहे. फ्रान्सने नागपूर व विदर्भात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करावी. या सहकार्य पर्वाची ही केवळ सुरुवात ठरेल. यामधील पुढील क्षितीजेही गाठायची असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात वन व खाण क्षेत्र विपुल प्रमाणात आहेत. उद्योगासाठी आवश्यक असलेले पाणी, वीज व वाहतूक सुविधाही येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ड्रायपोर्टच्या उभारणीद्वारे उद्योग क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. याद्वारे आयात-निर्यातीस चालना मिळेल. नागपूर व परिसरात मोठ्या शैक्षणिक संस्था, मिहान व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत. कुशल मनुष्यबळही उपलब्ध होत आहे. नागपूर येथील मेट्रो वैशिष्ट्यपूर्ण असून मेट्रोच्या उभारणीमध्ये अनेक फ्रेन्च तंत्रज्ञांचा समावेश आहे. मेट्रोसाठी पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही श्री गडकरी यांनी सांगितले.
फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर म्हणाले, ‘इंडो-फ्रेन्च इन्व्हेस्टमेंट समिट-कॉनक्लेव्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दीडशेहून अधिक प्रतिनिधी यासाठी उपस्थित राहिले, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रातील सहकार्याबाबत यामध्ये चर्चा झाली. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशातील अनेक बाबींमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. काही समान मूल्ये आहेत. मैत्रीचे संबंध असणाऱ्या या दोन्ही देशांमध्ये अनेक ज्वलंत आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणुकींसाठी सहकार्य व सामंजस्य आहे. दोन्ही देशांदरम्यान सहकार्याच्या क्षेत्रातील अनेक संधी अद्यापही आहेत. फ्रान्समधील अनेक कंपन्या भारतात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करीत असून याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे. नागपूर स्मार्ट सिटी व मेट्रोसाठीही फ्रान्सचे सहकार्य राहील. ‘इज ऑफ डुईंग’मध्ये भारत व महाराष्ट्र अग्रेसर असून आर्थिक, व्यापारी व उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी व सहकार्यासाठी ‘टीम फ्रान्स’ सदैव तत्पर राहील, असेही श्री. झिगलर यांनी सांगितले. इंडो-फ्रान्स चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री यांग यांचेही यावेळी भाषण झाले. श्री प्रसन्न मोहिले यांनी प्रास्ताविक केले.  Print


News - Nagpur | Posted : 2018-11-03


Related Photos