महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर मनपाने सुरु केली माणूसकीची बँक   


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण कपडे, घरातील सामान इत्यादी वस्तु नविन विकत घेतो कारण आपल्या दृष्टीने त्या जुन्या वस्तुंची गरज संपलेली असते. मग त्या जुन्या वस्तुंचे आपण काय करतो. आपल्या दृष्टीने जरी त्या जुन्या असल्या तरी समाजात कुणाला तरी त्या वस्तुंची आवश्यकता असते. त्यामुळे या जुन्या वस्तु एका जागी जमा करून त्या गरजुंना देणे या हेतुने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माणूसकीची बँक सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उदघाटन २५ जानेवारी रोजी आझाद गार्डन जवळील आसरा बेघर निवारा केंद्रात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत 3R (रिड्युस, रिसायकल व रियुझ ) तत्वानुसार पुनर्वापर संकल्पने अंतर्गत गरजु व्यक्तींसाठी सदर बँक सुरु करण्यात आली असुन नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा या उक्तीवर बँकेचे कार्य चालणार आहे. चांगल्या स्थितीतील कपडे, चादर, ब्लँकेट, भांडी या वस्तूंचे संकलन करून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. थंडीची हुडहुडी भरत असताना मनपातर्फे बेघरांना रात्रीच्या वेळेस शोधुन बेघर निवारा केंद्रात आणुन त्यांची सोय केली जाते. आता त्याच बेघर निवाऱ्यात कपडे, पादत्राणे व पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत. आझाद गार्डन जवळील मनपा आसरा बेघर निवारा केंद्रात सद्यस्थितीत लहान मुलांचे कपडे, मोठ्यांचे कपडे, स्त्रियांसाठी साडी व इतर कपडे, स्वयंपाक घरातील भांडी, चपला, जोडे, स्वेटर व इतर थंडीचे कपडे, महिलांसाठी चपला, पुस्तके इत्यादी साहीत्य उपलब्ध आहे. पुरुषांचे साहित्य, महिलांचे साहित्य, लहान मुलांचे साहित्य वेवेगळ्या कपाटात ठेवण्यात आले आहे.
तरी शहरातील नागरीकांनी आपल्या जवळील वापरण्या योग्य व स्वच्छ असे पुरुषांचे, महिलांचे, लहान मुलांचे जुने कपडे तसेच जुने चप्पल, जोडे, सॅंडल, वापरण्यायोग्य पुस्तक, मासिक, कादंबरी, रजिस्टर, बुक इत्यादी असतील आझाद गार्डन जवळील आसरा बेघर निवारा केंद्रात आणुन देण्याचे तसेच शहरातील स्वयंसेवी संस्थांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. अधिक माहिती करिता गोपाळ गायधने ९८२२४५००२१ यांच्याशी संपर्क साधता येईल. याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील व सचिन माकोडे, डॉ. अमोल शेळके, शहर कार्यक्रम व्यवस्थापक रफीक शेख, रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, समुदाय संघटक सुषमा करमनकर , खडसे, मून, लोणारे, पाटील, जवादे,गायधने, देवतळे, सोनू बिरे, काकडे व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत कर्मचारी उपस्थीत होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos