हळदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची ६ कोटींनी फसवणूक , आरोपी गजाअाड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अमरावती : अधिक भाव देण्याची बतावणी करून शेकडो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची हळद खरेदी केली तसेच ओळखीच्या काही श्रीमंत व्यक्तींना गाठून त्यांनाही हळदीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याची बतावणी केली. याचप्रकारे शहरातील एका व्यक्तीकडून तब्बल ७५ लाख रुपये घेतल्याच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध फसवणुुकीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आरोपीला ३१ ऑक्टोबर रात्री अटक केली आहे.
अतुल साहेबराव लव्हाळे (३६), रा. ढंगारखेडा, वाशीम ह. मु. पन्नालाल नगर, अमरावती असे पोलिसांनी अटक केलेल्या ठकबाजाचे नाव आहे. अतुल लव्हाळेने मागील दोन ते अडीच वर्षात जिल्ह्यातील विवीध भागातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना गाठले. बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा अधिक भाव हळदीला देतो, अशी शेतकऱ्यांना बतावणी करायची आणि त्यांच्याकडून हळद घेऊन जायची, पैसे काही दिवसानंतर मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना द्यायचे. काही दिवस शेतकऱ्यांनी त्याला पैसे मागितले नाही मात्र अनेक दिवस उलटूनही लव्हाळेने पैसे दिले नाही. त्याच्यासोबत संपर्कही होत नव्हता आणि जिल्ह्यातील अनेक भागात लव्हाळेने पैसे न देता पेाबारा केल्याची बाब शेतकऱ्यांना माहीती झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. त्यामुळेच जिल्ह्यातील समरसपुरा, कुऱ्हा, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या पोलिस ठाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अतुल लव्हाळेविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. मात्र लव्हाळे पोलिसांनाही चकमा देवून पसार झाला हाेता.
२४ एप्रिल २०१८ ला गाडगेनगर पोलिस ठाण्यात अरुण रामरावजी ढोबळे यांनी अतुल लव्हाळेविरुद्ध तब्बल ७४ लाख ९० हजार रुपयांनी फसवल्याची तक्रार दिली. ढोबळे हे लव्हाळेच्या परिचित होते. हळदीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात नफा असून तुम्ही रक्कम गुंतवल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे सांगतल्यामुळे ढोबळेने लव्हाळेवर विश्वास ठेऊन दोन वर्षांपूर्वी तब्बल ७४ लाख ९० हजार रुपये दिलेत. मात्र लव्हाळेने पैसे परत केले नाही. त्यामुळे ढोबळे यांनी गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली. यावेळी तक्रारीत अतुल लव्हाळेची पत्नी व त्याचे वडील साहेबराव लव्हाळे यांचाही उल्लेख असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, गाडगेनगर पोलिसांकडून सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून अतुल लव्हाळेचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडत नव्हता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयातही अर्ज केला होता मात्र त्याला जामीन मिळाला नाही. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंजाबराव वंजारी यांच्या नेतृत्वात पीएसआय प्रवीण पाटील, एएसआय दिलीप वाघमारे, राजू शेंडे, शैलेश रोंघे, विनोद धुळे, अस्मीता खांडवाये या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
News - Rajy | Posted : 2018-11-02