चामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा


- नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत चामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण व विकास करण्याची निविदा २३ जुलै २०१७ रोजी नगर परिषद गडचिरोलीच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आले. काम सुरु करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असूनही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम सुरु केले नाही. यामुळे या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा, चिखल साचले आहे. याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असून मंजूर असलेले सौंदर्यीकरणाचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील खुली जागा म्हणजे खूप मोठा खड्डाच आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पाणी साठून गटाराचे रूप आलेले आहे. सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य आहे. वनस्पतींची वाढ झालेली आहे. पाण्यामुळे डासांची निर्मिती होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट डुकरे मरून राहतात. यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. पावसाळ्यात खड्डा भरून पाणी अंगणात शिरते. तसेच घाण पाणी विहिरीतही जात आहे. पाणी साठून राहत असल्यामुळे भिंतीतून विहिरीमध्ये पाणी जात असल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. नगर परिषदेच्या वतीने नळाचे पाणी एकाच वेळेत आणि तेही नाममात्र दिले जात आहे. यामुळे विहिरीतील गढूळ पाण्यावर नागरिकांना अवलंबुन राहावे लागत आहे. अनुबाजूला मानवी वस्ती आहे. लहान मुलांचे कोचिंग क्लासेस आहेत, खेळतांना छोटी मुले खड्ड्यात पडून प्राणहानीचा धोका आहे.
अशा अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लेखी तक्रार देऊनही नगर प्रशासनाने डोळे झाक केलेली आहे.
विशेष म्हणजे सदर जागेच्या विकास व सौंदर्यीकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान अंतर्गत निधी मंजूर झालेला आहे. तसे आदेश संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला प्राप्त होऊनही अजून कुठलीही कामे सुरु केलेली नाहीत. या बाबत न.प. कडे पत्रव्यहार करूनही कुठलीही दखल घेण्यात आली नाही. या ठिकाणी जीवितहानी झाल्यास नगर परिषद प्रशासन जबाबदारी घेणार का ? असा येथील जनतेचा सवाल आहे. तरी नागरिकांच्या या समस्येला वाचा फोडून न.प. ने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2018-11-02