राज्यातील ३३ प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते १० वी तर २६ माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास मान्यता


-  राज्यातील दुर्गम-आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई
:  राज्यातील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी राज्य शासनाने ३३ प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते १० वी तर २६ माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षणासोबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती थांबावी यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या शाळांची माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी श्रेणीवाढ करण्यासाठी २६.०३ कोटी इतका अतिरिक्त खर्च येणार आहे.
आजच्या निर्णयानुसार ठाणे, पालघर, यवतमाळ, अमरावती, अकोला, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक व गडचिरोली या जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २७ शासकीय व सहा अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांमध्ये आठवी ते १० वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे या भागातील ४९५० विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच १५ शासकीय व ११ अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांमध्ये ११ वी व १२ वीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे या भागातील ५२०० विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-01


Related Photos